ऑनलाईन टीम / मुंबई :
सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे सध्या शाळा, महाविद्यालये बंद आहेत. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात येत आहे. ऑनलाईन शिक्षणातून पाचवीपर्यंतच्या वर्गांना सूट देण्यात आली होती. मात्र, आता शिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. तसा शासन निर्णय जारी केला आहे.
या नव्या निर्णयानुसार आता इयत्ता दुसरीपर्यंतच्या वर्गासाठी सुद्धा ऑनलाईन शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. यामध्ये 30 मिनिटे ऑनलाईन शिक्षण घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. यात 15 – 15 मिनिटांचे दोन वर्ग घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या सुधारित वेळापत्रकानुसार पूर्व प्राथमिकचे वर्ग सोमवार ते शुक्रवार 30 मिनिटे घेण्यात येणार आहे. यासाठी पालकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. पहिली आणि दुसरी इयत्तेसाठी सोमवार ते शुक्रवार 30 मिनिटांमध्ये दोन सत्र घेतले जाणार असून 15 मिनिटे पालकांशी संवाद आणि मार्गदर्शन तसेच 15 मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रम आधारित शिक्षण दिले जावे, असे निर्देश शाळांना दिले आहेत, तसे ट्विट शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
आता पूर्व प्राथमिक आणि पहिली, दुसरीसाठी सुद्धा ऑनलाईन वर्ग घेण्याचे वेळापत्रक दिले आहे. यामध्ये तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची 45 मिनिटांची दोन सत्रे शाळा घेऊ शकणार आहेत. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची 45 मिनिटांची एकूण चार सत्रे शाळा घेऊ शकणार असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे.