‘कोरोना’च्या संकटामुळे कंपनीचे आवाहन : एलपीजी बुकिंगवरही निर्बंध
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
कोरोना विषाणूमुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनच्या भयापोटी लोक घाबरून विविध वस्तूंची भरमसाठ खरेदी करीत आहेत. हे थांबविण्यासाठी प्रशासनामार्फतही सतत आवाहन केले जात आहे. कोरोना विषाणूचा विचार करता लोकांना ‘पॅनिक बुकिंग’ न करण्याचे आवाहन सरकारी तेल कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने (आयओसी) केले आहे. याशिवाय एलपीजी केवळ 15 दिवसांच्या फरकाने बुक केले जाऊ शकते. देशात एलपीजीची कमतरता नाही, असे तेल कंपनीचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितले आहे.
देशभरात पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा सुरळीत आहे. पेट्रोल, डिझेल किंवा स्वयंपाकाच्या गॅसमध्ये कोणतीही कमतरता किंवा समस्या नाही. विशेषत: एलपीजीचा पुरवठा सुरळीत सुरू आहे आणि सुरू राहील. पॅनिक बुकिंग करू नये अशी ग्राहकांना विनंती आहे. यामुळे प्रणालीवर अनावश्यक दबाव पडला जातो. त्यामुळे ग्राहक कमीतकमी 15 दिवसांच्या अगोदर रिफिल बुकिंग करू शकणार नाहीत, अशी यंत्रणा आम्ही सुरू केली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
एलपीजीच्या मागणीत वाढ
लॉकडाऊनपासून देशात पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी झाला असून, एलपीजीची मागणी वाढली आहे. आत्तापर्यंत ग्राहकांना बुकिंगसाठी कोणतीही मर्यादा नव्हती. मात्र, प्रणालीवर पडणाऱया दबावापोटी आयओसीने बुकिंगवर मर्यादा आणली आहे. सामान्य ग्राहकांना वर्षामध्ये प्रथम 12 घरगुती एलपीजी सिलिंडरवर अनुदान मिळते, तर त्यानंतरच्या सिलिंडरवर अनुदान मिळत नाही.
वितरण कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्यास 5 लाखाची भरपाई रक्कम
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे एलपीजी वितरण कर्मचाऱयाचा मृत्यू झाला तर त्यांच्या कुटुंबियांना किंवा त्याच्या जोडीदारास पाच लाख रुपयांची भरपाई रक्कम देण्यात येणार आहे. कंपनीच्या परिपत्रकानुसार कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.