महिला टेबल टेनिसमध्ये भाविना पटेल, उंच उडीत निषाद कुमार यांना रौप्य, थाळीफेकमध्ये विनोद कुमारचे कांस्य रोखले
वृत्तसंस्था/ टोकियो
येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक्समध्ये रविवारी भारताच्या तीन ऍथलेट्सनी पदके पटकावत राष्ट्रीय क्रीडादिन साजरा केला. भाविनाबेन पटेलने भारताला या स्पर्धेतील पहिले पदक मिळवून देताना टेबल टेनिसमध्ये रौप्यपदक पटकावत नवा इतिहास घडविला. त्यानंतर निषाद कुमारने पुरुषांच्या उंच उडीमध्ये दुसरे स्थान मिळवित रौप्यपदक पटकावले. विनोद कुमारने पुरुषांच्या थाळीफेकमध्ये कांस्यपदक मिळविले असले तरी त्याचे पदक रोखण्यात आले आहे. मेजर ध्यान चंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो आणि याच दिवशी भारतीय खेळाडूंनी पदके मिळविल्याने देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

34 वर्षीय भाविनाबेन पटेलने या स्पर्धेत शानदार प्रदर्शन करीत पॅरा टेबल टेनिस क्लास 4 च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र अंतिम लढतीत तिला चीनच्या यिंग झोयूकडून 11-7, 11-5, 11-6 असा पराभव स्वीकारावा लागल्याने तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पॅरा टेबल टेनिसमध्ये भारताला मिळालेले हे पहिलेच पदक आहे. शिवाय पॅराऑलिम्पिक्समध्ये पदक मिळविणारी ती भारताची दुसरी महिला खेळाडू बनली आहे. यापूर्वी दीपा मलिकने रिओ पॅरालिम्पिक्समध्ये गोळाफेकीत रौप्यपदक पटकावले होते. झोयूने याआधी पॅरालिम्पिक्समध्ये दोन वेळा सुवर्णपदक पटकावले आहे. पॅरालिम्पिक्स टेटेमधील ती सर्वात यशस्वी खेळाडू असून तिने आजवर एकूण 5 पदके पटकावली आहेत. प्राथमिक फेरीतही भाविनाला झोयूकडून पराभव पत्करावा लागला होता. ‘मला पाठिंबा दिलेल्या पीसीआय, साई, टॉप्स, ब्लाईंड पीपल असोसिएशन आणि माझ्या सर्व मित्रांना व कुटुंबीयांना मी हे पदक समर्पित करते,’ असे भाविना नंतर म्हणाली. ‘प्रशिक्षकांनाही हे पदक मी समर्पित करते. कारण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखविला आणि कठोर मेहनत घेतली म्हणूनच मला इथवर पोहोचता आले. फिजिओ, डाएटिशियन, क्रीडा मानसोपचार तज्ञ यांची मी खास आभारी आहे. तेच मला सतत प्रेरित करीत होते,’ अशा भावनांही तिने व्यक्त केल्या.
सहा वेळची वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या झोयूने पटेलला तिच्या बलस्थानानुसार खेळण्याची संधीच दिली नाही. त्यामुळे पटेलला तिने योजलेल्या डावपेचांनुसार खेळ करता आला नाही. पहिल्या दोन गेममध्ये झोयूने बाजी मारत आघाडी घेतली. तिसऱया गेममध्ये पटेलने 5-5 पर्यंत तोडीस तोड खेळ केला. पण झोयूने पुन्हा तिला मागे टाकत हा गेमही जिंकला आणि सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केला. पटेलने उपांत्य फेरीत जागतिक तिसऱया मानांकित चीनच्या मियाव झँगचा 7-11, 11-7, 11-4, 9-11, 11-8 असा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला होता. त्याआधी उपांत्यपूर्व फेरीत तिने सर्बियाच्या रॅनकोविचचा पराभव केला होता. 2011 मध्ये थायलंडमध्ये झालेल्या पॅरा टेटे स्पर्धेत पटेलने रौप्यपदक मिळविल्यानंतर ती जागतिक क्रमवारीत दुसऱया स्थानावर पोहोचली होती. ऑक्टोबर 2013 मध्ये आशियाई पॅरा टेटे चॅम्पियनशिपमध्येही तिने रौप्यपदक जिंकले होते.
पटेलने पदक पटकावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह अनेक मान्यवरांनी तसेच आजी माजी खेळाडूंनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच निषाद कुमार व विनोद कुमार यांचेही त्यांनी कौतुक केले.
ऍथलेटिक्समध्ये भारताला दोन पदके
उंच उडीपटू निषाद कुमार व थाळीफेकपटू विनोद कुमार यांनी रविवारी भारताला ऍथलेटिक्समध्ये दोन पदके मिळवून देताना नवे आशियाई विक्रमही नोंदवले. 21 वर्षीय निषादने टी 47 क्लासमध्ये 2.06 मीटर्स उंच उडी घेत रौप्यपदक मिळविले. त्यानंतर 41 वर्षीय विनोद कुमारने एफ 52 कॅटेगरीत 19.91 मी. थाळीफेक करीत तिसरे स्थान मिळविले. भारताला ऍथलेटिक्समध्ये किमान दहा पदके मिळण्याची आशा असून एकूण 24 ऍथलेट्सनी या स्पर्धेत भाग घेतला आहे.
आठ वर्षाचा असताना गवत कापण्याच्या मशिनमध्ये अडकून हात कट झालेल्या निषादने 2.06 मी. अंतर पार केले. अमेरिकेच्या डल्लास वाईजनेही तितकेच अंतर पार केले होते. त्यामुळे त्यालाही रौप्यपदक देण्यात आले. अमेरिकेच्याच रोडेरिक टाऊनसेंडने 2.15 मी. अशी विश्वविक्रमी उंच उडी घेत सुवर्णपदक पटकावले. भारताच्या राम पालला मात्र (1.94 मी.) पाचवे स्थान मिळाले. निषादला बेंगळूरमधील साई केंद्रात सराव करताना यावर्षीच कोरोनाची लागणही झाली होती. यावर्षी दुबईत झालेल्या फझा वर्ल्ड पॅरा ऍथलेटिक्स ग्रां प्रिमध्ये निषादने सुवर्णपदक जिंकले होते.
विनोद कुमारचा आशियाई विक्रम
विनोद कुमारनेही येथील स्पर्धेत नवा आशियाई विक्रम नोंदवत थाळीफेकमध्ये कांस्य मिळविले. मात्र त्याच्या दिव्यांगत्व वर्गवारीवर आक्षेप घेतल्याने त्याचे पदक रोखण्यात आले. पोलंडच्या पिओत्र कोसेविझने 20.02 मी. थाळीफेक करीत सुवर्ण व क्रोएशियाच्या व्हेलिमिर सँडरने 19.98 मी. थाळीफेक करीत रौप्यपदक मिळविले. बीएसएफमध्ये ट्रेनिंग घेत असताना लेहमधील एका दरीत कोसळल्यानंतर त्याचे पाय निकामी झाले होते. याचे पदकवितरण सोमवारी होणार आहे.