निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेले नागरिक व वकील.
प्रतिनिधी / बेळगाव
गेल्या वर्षभरापासून सातत्याने पेट्रोल व डिझेल दरवाढ केली जात आहे. त्यामुळे महागाई वाढली असून केंद्र सरकारने प्रतिलीटर 20 रुपयांप्रमाणे पेट्रोल व डिझेल दर कमी करावेत, अशी मागणी बेळगाव येथील वकील व नागरिकांनी केली आहे.
या संबंधी शनिवारी जिल्हाधिकाऱयांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले. कोरोना काळात सातत्याने पेट्रोल व डिझेल दर वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तुंसह लोखंड, सिमेंट आदी बांधकामासाठी लागणारे साहित्यही महाग झाले आहे.
वाढत्या महागाईमुळे गरीब व सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे सरकारने त्वरित पेट्रोल व डिझेलचे दर प्रतिलीटर 20 रुपयांप्रमाणे कमी करावेत व जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी ऍड. आण्णासाहेब घोरपडे, ऍड. व्ही. आय. महांतशट्टर, ऍड. बी. पी. जेवणी, ऍड. सुभाष मोदगेकर, ऍड. शरद देसाई, ऍड. आर. एल. नलवडे, ऍड. बी. एम. बोंदे, ऍड. रवी बोगार, ऍड. बसय्या हिरेमठ, ऍड. सदानंद होसाप्पाचे, ऍड. वाय. के. दिवटे आदी उपस्थित होते.