गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान

प्रतिनिधी /पेडणे
गोवा राज्यातील प्रसिद्ध उत्सवापैंकी एक उत्सव म्हणजे पेडणेचा दसरोत्सव आणि कोजागिरी पौर्णिमेला येणारी पेडणेची पुनव. गोवा राज्यातील तसेच महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली पेडणेची पुनव आज बुधवार दि. 20 रोजी साजरी होणार आहे.
पुनवेनिमित्त पेडणेचे आराध्य दैवत श्री भगवती मंदिर परिसरात दरवर्षी विविध प्रकारची दुकाने थाटली जातात. यंदा कोरोनाचा कहर कमी असल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा मोठय़ा प्रमाणात दुकाने थाटण्यात आली आहेत.
मंदिर परिसरात दुकानांमुळे गजबज
यंदा श्री भगवती मंदिर परिसराचे गोवा पर्यटन विकास महामंडळातर्फे सुशोभिकरण काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर परिसराला एक वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे. जमिनीला स्टाईल्स बसविल्याने मंदिर परिसर स्वच्छ दिसत आहे. याठिकाणी उभारण्यात आलेल्या खाजे, मिठाई, खेळणी, भांडी, कपडय़ांची, फुल विपेते, केळी विपेते, देवीसाठी खण-नारळ ओटी विपेते आदी विविध दुकानांमुळे मंदिर परिसर फुलून गेला आहे. खरेदीसाठी भाविकांची गर्दी दिसत असून मंदिर परिसर गजबजू लागला आहे. मंदिरावर व मंदिर परिसरात आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. भगवे बावटे तसेच पतका लावण्यात आल्याने वातावरण उल्हासित झाले आहे.
भूते काढण्याची प्रथा मुख्य आकर्षण
यंदा पेडणेची पुनव ही कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱया दिवशी बुधवारी आली आहे. पाडव्याचा दिवस धरून हा उत्सव साजरा केला जातो. पेडण्याच्या पुनवेची दोन मुख्य आकर्षणे आहेत. त्यातील एक भूते काढण्याचा प्रकार हा मध्यरात्री देवाचा मांगर परिसरात होतो. यावेळी हजारो भाविक या ठिकाणी जमा होतात.
बांध तू सायबा…
पेडणेच्या पुनवेचे दुसरे आकर्षण म्हणजे ‘बांध तू सायबा…’ पेडणेचा दसरोत्सव हा घटस्थापनेपासून सुरू होते. ‘तरंगोत्सव’ हे याचे आकर्षण आहे. या दरम्यान भाविकांना कौल दिला जातो. हा कौल घेण्यासाठी विविध भागातून भाविक येत असतात. पुनवेच्या रात्री भुतनाथ देवाला दरवर्षी, तुझे मंदिर बांधतो, असे सांगितले जाते. त्याला ‘बांध तू सायबा’ म्हणून फसविले जाते. त्याला राग येतो व तो डोंगराळ भागात धावतो मग त्याची मनधरणी करण्यात येते. हा प्रसंग पाहण्यासाठी खूप गर्दी जमते.
इच्छुक राजकीय उमेदवार व लोकप्रतिनिधींचे बाजारपेठेत शुभेच्छा फलक
गोवा विधानसभा निवडणुकीची तयारी सध्या जोरदार सुरू आहे. पेडणेच्या पुनवेला भाविक मोठय़ा संख्येने येतात. त्यामुळे विविध पक्षाच्या नेत्यांनी तसेच इच्छुक उमेदवारांनीही याठिकाणी बॅनर लावून पुनवेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, मगो नेते प्रविण आर्लेकर, मिशन लोकलचे राजन कोरगावकर, शिवसेनेचे सुभाष केरकर, तेलंग पंचवाडकर, नगराध्यक्ष उषा नागवेकर, नगरसेवक विष्णू साळगावकर, माधव सिनाय देसाई आदींचा समावेश आहे.
बाबूंचे पालिका मंडळावर प्रेम, पालिका क्षेत्रात शुभेच्छा बॅनर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी विधानसभा निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून पेडणे पालिका क्षेत्रातील दहाही प्रभागात आपल्या फोटोसह स्थानिक नगरसेवकाच्या फोटोचा बॅनर लावून दसरा आणि पुनवेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.