अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराने निधन -उद्या बेंगळूरमध्ये होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
प्रतिनिधी/ बेंगळूर
कन्नड चित्रपटसृष्टीत ‘अप्पु’ आणि ‘पॉवरस्टार’ म्हणून ओळख असलेले अभिनेते पुनीत राजकुमार (वय 46) यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. बेंगळूरमधील निवासस्थानी व्यायाम करत असताना पुनीत यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टी शोकसागरात बुडाली आहे. तर चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रसिद्ध दिवंगत अभिनेते डॉ. राजकुमार यांचे ते तृतीय चिरंजीव होते. पुनीत राजकुमार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
शुक्रवारी सकाळी 7 वाजता बेंगळूरच्या सदाशिवनगर येथील निवासस्थानी असलेल्या जीममध्ये व्यायाम करत असताना अभिनेते पुनीत राजकुमार यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना रमणश्री इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती आणखी खालावल्याने त्यांना विक्रम इस्पितळात आणण्यात आले. मात्र, उपचाराचा उपयोग न झाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 46 वर्षे इतक्या कमी वयात त्यांचे निधन झाल्यामुळे देशातील चित्रपटसृष्टीला धक्काच बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी अश्विनी, दोन मुली, भाऊ अभिनेता शिवराजकुमार, अभिनेता राघवेंद्र राजकुमार असा परिवार आहे. पुनीत यांचे पार्थिव बेंगळूरमधील कंठिरवा क्रीडांगणावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. रविवारी त्यांच्या पार्थिवावर कंठिरवा स्टुडिओमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची रीघ
बेंगळूरमध्ये पुनीत यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून चाहते मोठय़ा संख्येने दाखल होत आहेत. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शहरात व्यापक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय बेंगळूर विद्यापीठाची शनिवारी होणारी एमबीए परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे.
…अन् चित्रपटगृहे ठेवली बंद
पुनीत यांचे ज्येष्ठ बंधू अभिनेते शिवराजकुमार यांचा ‘बजरंगी-2’ हा चित्रपट शुक्रवारी राज्यभरातील चित्रपटगृहात झळकला होता. मात्र, याच दिवशी पुनीत राजकुमार यांचे निधन झाले. त्यामुळे दुखवटा म्हणून शुक्रवारी राज्यातील चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. तर शहरातील अनेकांनी आपली दुकाने बंद ठेवून दुखवटा व्यक्त केला आहे.
बालपणापासूनच चित्रपटात चमक
कन्नड चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेते डॉ. राजकुमार आणि चित्रपट निर्मात्या पार्वतम्मा राजकुमार यांचे कनिष्ठ पुत्र असणारे पुनीत राजकुमार यांनी बालपणापासून चित्रपट क्षेत्रात ठसा उमटविला होता. अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यातही ते आघाडीवर होते. सध्या ते ‘जेम्स’ या कन्नड चित्रपटाच्या कामात गुंतले होते. बालकलाकार म्हणून कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या पुनीत राजकुमार यांनी वयाच्या 10 व्या वर्षीच राष्ट्रीय पातळीवरील अत्युत्तम बालकलाकार पुरस्कार पटकावला होता. 1985 मध्ये कन्नड चित्रपट ‘बेट्टद हुवू’ चित्रपटातील ‘रामू’ या पात्राच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
25 हून अधिक हिट चित्रपट
2002 मध्ये अप्पु या चित्रपटापासून पुनीत यांनी अभिनेत्याची प्रमुख भूमिका साकारण्यास प्रारंभ केला होता. त्यानंतर मिलन, जॉकी, हुडूगरु, यारे कुगाडली, रणविक्रम, अण्णा बॉण्ड, राजकुमार, अरसू, राजकुमार, अंजनीपुत्र, पॉवर, युवरत्न यासह सुमारे 25 सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले होते. त्यांच्या अनेक चित्रपटांना राज्य, दक्षिण भारत, फिल्मफेअर पुरस्कारही प्राप्त झाले होते. प्रेमद काणिके, तायीगे तक्क मग, यारिवनू, वसंतगीते, एरडू नक्षत्र यासह अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून त्यांनी काम केले होते. कन्नडमधील ‘कौन बनेगा करोडपती’ म्हणून नावाजलेल्या ‘कोटय़धीपती’ या कार्यक्रमात निवेदक म्हणूनही ते लोकप्रिय ठरले होते. पीआके ऑडियो कंपनी सुरू करून संगीत क्षेत्रातही पुनीत राजकुमार यांनी पदार्पण केले होते.
नेत्रदानाने मृत्यूनंतरही नाव सार्थकी
कोणताही गाजावाजा अगर प्रसिद्धी न मिळविता समाजसेवेत गुंतलेल्या पुनीत राजकुमार यांनी मृत्यूनंतरही आपले नाव सार्थकी लावले आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच पुनीत यांनीही मरणोत्तर नेत्रदान केले आहे. त्यांचे डोळे नारायण नेत्रालयाला दान करण्यात आले असून ते दोन दृष्टीहीन व्यक्तींना प्रत्यारोपण करण्यात आले आहेत.
…जग सोडून जाण्याचे त्यांचे वय नव्हते !
नियतीच्या पूर वळणाने पुनीत राजकुमार यांच्यासारखा समृद्ध आणि प्रतिभावंत अभिनेता आपल्यातून ओढून नेला. त्यांचे हे वय जग सोडून जाण्याचे नव्हे. पुढील पिढीसाठी त्यांचे कार्य आणि व्यक्तिमत्व स्मरण करण्यासारखे आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहे.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान