बेळगाव, मस्की, बसवकल्याणमधून एकूण 70 अर्ज दाखल : आज अर्ज छाननी : 17 एप्रिलला मतदान तर 2 मे रोजी निकाल
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील एक लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. दरम्यान, प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. बुधवार दि. 31 मार्च रोजी अर्जांची छाननी होणार असून 3 एप्रिल रोजी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 17 एप्रिल रोजी मतदान तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या मंगला अंगडी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, निजदने येथे उमेदवार दिलेला नाही. बेळगाव मतदारसंघात एकूण 23 उमेदवारांनी 33 अर्ज दाखल केले आहेत. तर बिदर जिल्हय़ाच्या बसवकल्याण विधानसभा मतदारसंघातून भाजपतर्फे शरणू सलगार, काँग्रेसतर्फे मल्लम्मा आणि निजदतर्फे सय्यद यस्रबअली काद्री यांचे अर्ज दाखल झाले असून येथे एकूण 14 उमेदवारांचे 24 अर्ज दाखल झाले आहेत.
त्याचप्रमाणे रायचूर जिल्हय़ातील मस्की मतदारसंघात भाजपतर्फे प्रतापगौडा पाटील, काँग्रेसतर्फे बसवनगौडा तुर्विहाळ यांच्यासह एकूण 10 उमेदवारांकडून 13 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने बसवकल्याण आणि बेळगाव मतदारसंघातून उमेदवार दिला आहे. तर निजदकडून केवळ बसवकल्याण मतदारसंघात उमेदवार देण्यात आला आहे.
माजी आमदार खुबा यांची बंडखोरी
भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन खुबा यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून बसवकल्याण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले मल्लिकार्जुन खुबा यांनी मंगळवारी अपक्ष उमेदवार म्हणून पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. भाजप नेत्यांनी खुबा यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. 2018 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपप्रवेश केला. त्यावेळी ते पराभूत झाले होते. मात्र, या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिले नाही.
बसवकल्याणमध्ये राष्ट्रवादीकडूनही उमेदवार रिंगणात
बिदर जिल्हय़ातील बसवकल्याण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमेदवार पोटनिवडणूक रिंगणात उतरविला आहे. राष्ट्रवादीचे नेते एम. जी. मुळे यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मतदारसंघनिहाय उमेदवार
पक्ष | बेळगाव(लोकसभा) | मस्की (विधानसभा) | बसवकल्याण (विधानसभा) |
भाजप | मंगला अंगडी | प्रतापगौडा पाटील | शरणू सलगार |
काँग्रेस | सतीश जारकीहोळी | बसवनगौडा तुर्विहाळ | मल्लम्मा |
निजद | – | – | सय्यद यस्रब अली काद्री |