आंदोलकांकडून महिला पोलिसांना धक्काबुक्की : संतप्त पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज युवा काँग्रेसच्या 22 जणांना अटक

प्रतिनिधी /पणजी
राज्यातील युवा काँग्रेसने काल मंगळवारी बेकारी व वाढत्या महागाई विरोधात केलेले आंदोलन चिघळले. भाजप सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलनकर्ते आझाद मैदानाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत असताना पोलिसांनी त्यांना अडविले. आंदोलनकर्त्यांनी महिला पोलिसांना धक्कबुक्की केल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला. याप्रकरणी 22 काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सशर्त जामिनावर सुटका करण्यात आली.
आझाद मैदानावर सकाळी युवा काँग्रेसचे आंदोलन सुरु होते. पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला होता. संपूर्ण आझाद मैदानाला जणू छावणीचे स्वरूप आले होते. आंदोलनासाठी कोणताही रितसर पोलीस परवाना घेण्यात आला नव्हता. तरीही आझाद मैदानावरुन आंदोलकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आल्तीनो येथील शासकीय बंगल्यावर मोर्चाने जाण्याचा निर्णय घेतला आणि मैदानावरुन बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांना अडविले.
आंदोलक-पोलिसांत धक्काबुक्की
आंदोलकांना अडविल्यानंतर पोलीस व आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली. पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. अखेर पोलीस व आंदोलनकर्ते यांच्यात धक्कबुकीही झाली. आंदोलकांमध्ये अधिकतम कार्यकर्ते गोव्याबाहेरील दिल्ली, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आसाम, राजस्थान येथील होते. काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते ज्यादा आक्रमक नसल्याचे दिसून येत होते तर परराज्यांतून आलेले कार्यकर्ते खूप आक्रमक होते.
पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांना दुखापत
पणजी पोलिसस्थानकाचे निरीक्षक सुदेश नाईक यांच्या हाताला मार लागला. आंदोलनकर्त्यांनी महिला पोलिसांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली तेव्हा पोलासांनी लाठीचार्ज करायला सुरुवात केली. अवघ्या काही मिनिटांतच आंदोलन आटोक्यात आणले. पणजीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष देसाई यांनी रुद्रावतार धारण करून ते आंदोलनकर्त्यांच्या विरोधात मैदानात उतरले होते.
बावीस आंदोलकांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्यांमध्ये श्रीनिवास बी. व्ही. (39 दिल्ली), अकलेश यादव (33 दिल्ली), मोहमद नाप्लाद (30 दिल्ली), वरद म्हार्दोळकर (33 म्हार्दोळ), जना भंडारी (45 पैगीणी-काणकोण), आलेक्स सिक्वेरा (64 राय सालसेत), जोसेफ डायस (52चिंचिणी सालसेत), गौतम भगत (33 साखळी), चंदन मांद्रेकर (41 आसगाव बार्देश) अर्चित नाईक (27 मडगाव), मनीश देसाई (21 काणकोण), नवदीप फळदेसाई (29 गावडोंगरी), ग्लेन काब्राल (35 ओल्ड गोवा) मनीश चौधरी (36 मध्यप्रदेश), कमरुल इस्लाम चौधरी (34 आसाम) अब्राम रॉय मनी (40 मुंबई), रियाझ अंसारी (35 दिल्ली), वैशव विनोद पेडेणेकर (25 काणकोण), प्रदीप विरेंद्र सिंग (35 दिल्ली), विकास कुमार (26 राजस्थान), विल्मा फर्नांडिस (35 केपे), रेखा देसाई (39 केपे) यांचा समावेश होता.
जनता हालाखीचे जीवन जगत आहे : कामत
प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृतवाखाली झालेल्या या आंदोलनात आमदार व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, युवा काँग्रेस प्रमुख कृष्णा अल्लावरू, संकल्प आमोणकर, विशाल वळवईकर, समील वळवईकर, यांच्यासह सुमारे 200 काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. वाढत्या महागाईमुळे तसेच बेकारीमुळे गोव्यातील जनता हालाखीचे जीवन जगत आहे, असे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले. प्राथमिक गरजेसाठी लागणाऱया वस्तूही खरेदी करताना लोकांच्या नाकीनऊ येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिन आयेंगे, असे म्हटले होते. हेच काय ते अच्छे दिन? अच्छे दिन सामान्य लोकांसाठी नव्हेत, तर अंबानी, अदानीसारख्या धनाडय़ांचे असल्याचे कामत म्हणाले.
दरम्यान दुपारी दीडच्या सुमारास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कृतीचा निषेध केला. त्यांच्यासोबत दिगंबर कामतही उपस्थित होते. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा हक्क आहे. सरकार आपले अपयश लपविण्यासाठी जनतेवर दडपण आणण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकार वस्तुस्थितीला सामोरे जाण्यास घाबरत असून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही चोडणकर यांनी सांगितले. पोलिसांनी काँग्रेस युवकांवर केलेला लाठीचार्ज व नंतर त्यांना केलेली अटक या कृतीचा काँग्रेस निषेध करीत असल्याचेही चोडणकर म्हणाले.