रात्री उशिरा कैद्यासह तिघांनाही केले जेरबंद : कैद्याला इस्पितळात नेले असता पलायननाटय़ : दिवसभरातील कडक तपासणीनंतर रात्री झाली अटक
- इस्पितळातून बाहेर आल्यावर सुरु झाले पलायन
- देशी कट्टा बंदुकीने पोलिसांवर केला गोळीबार
- दुचाकीवरुन आलेल्यांनी केली पलायनास मदत
- पोलिसांकडून पूर्ण मेगझीन 7.65 एमएम राऊंड बुलेट जप्त
- वैद्यकीय सेवा नसल्याने संशयिताचे फावले
प्रतिनिधी / म्हापसा
कोलवाळ मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगणारा खंडणी बहाद्दर विवेककुमार गौतम उर्फ आर्यन प्रमोदकुमार गौतम, (सध्या रा.कळंगूट व मूळ चंद्रनगर आग्रा येथील) याला म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात उपचारासाठी नेले असता फिल्मी स्टाईलने पळ काढला. पोलीस व त्याच्यामध्ये झालेल्या झटापटीत त्याने पोलिसांवर पेपर प्रेचा वापर केला. त्याचा पाठलाग करणाऱया पोलीस एस्कॉर्ट शिपायावर गोळीबार करण्यात आला. मात्र शिपाई दैव बलवत्तर म्हणून बचावले. पोलिसांनी दिवसभर कडक तपासणी केल्यानंतर रात्री उशिरा विवेककुमार याच्यासह त्याला पळण्यास मदत केलेल्या अन्य दोघांना मिळून तिघांनाही जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.

सदर घटना बुधवार दि. 30 रोजी रात्री 12 वाजून 15 मिनिटांनी म्हापसा आझिलोसमोर घडली. फिल्मी स्टाईलने झालेल्या या घटनेमुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. संशयिताचा राज्यभर सर्वत्र कसून शोध घेण्यात आला. या धाडसी पलायनामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
म्हापसा पोलिसात तक्रार दाखल
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जेलचे एस्कॉर्ट पोलीस शिपाई& नितीन आंबेकर यांनी म्हापसा पोलीस स्थानकात रितसर तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी 342, 307, 224, 120 ब आर बंदूक कलम 25.27 अन्वये गुन्हा दाखल करून घेतला आहे.
इस्पितळातून बाहेर आल्यावर सुरु झाले नाटक
कैदी †िववेककुमार गौतम याच्या पोटात दुखू लागल्याने व उलटय़ा होऊ लागल्याने त्याला तुरुंगाच्या रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात आणण्यात आले होते. त्याच्यासमवेत एस्कॉर्टचे हवालदार राजेश सराफ व पोलीस शिपाई नितीन आंबेकर होते. इस्पितळाच्या कॅझ्युअल्टीमध्ये तपासणी झाल्यावर दोघेही एस्कॉर्ट पोलीस विवेक गौतम याला घेऊन बाहेर आले असता इस्पितळाबाहेर तुरुंगाची रुग्णवाहिका नव्हती, त्यामुळे ते रुग्णवाहिका पाहण्यासाठी खाली आले असता येथूनच फिल्मी स्टाईलने पूर्वनियोजित नाटकाला सुरुवात झाली.
देशी कट्टा बंदुकीने गोळीबार
पोलीस विवेक गौतम याला घेऊन बाहेर आले असता पूर्वनियोजित प्लॅनप्रमाणे विवेक याने शिपायांच्या हातातील बेडय़ा हिसकावून तेथून बाजूला असलेल्या रस्त्यातून पळ काढण्यास सुरुवात केली, मात्र शिपाई नितीन यांनी त्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली असता गेटजवळ एक इसम उभा होता, त्याने शिपाई नितीनच्या डोळय़ात पेपर प्रे मारण्यास सुरुवात केली. मात्र त्याला न डगमगता नितीनने आपला पाठलाग सुरूच ठेवला. पुढे काळय़ा-निळय़ा कलरच्या डिओ स्कूटरने अन्य इसम उभा होता त्या स्कूटरवरून आरोपीने पळ काढला. सुमारे 100 मीटर अंतरावर धाव घेत आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करीत असल्याचे पाहून त्या बाजूला असलेल्या इसमाने देशीकट्टा बंदुकीमधून गोळीबार केला. त्यात नितीन खाली पडले मात्र सुदैवाने ते या गोळीबारातून बचावले. अखेर त्या आरोपीने तेथून पळ काढला.
हवालदार राजेश सराफ जातेवेळी डॉक्टर डय़ुटी बुकवर सही करण्यास मागे राहीले होते अखेर त्यांनी पाठीमागून धावपळ केली, तोपर्यंत तिघाही आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. डिओ गाडीवरून आलेल्या दोघाही संशयित आरोपींनी जॅकेट परिधान केले होते. जी घटना घडली त्यावरून हा पूर्वनियोजित कट असल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांकडून पूर्ण मेगझीन 7.65 एमएम राऊंड बुलेट जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून पूर्ण मेगझीन 7.65 एमएम राऊंड बुलेट जप्त केली आहे. शिवाय आरोपीने तोडलेल्या बेडय़ाही सापडल्या आहेत. इस्पितळातील सीसीटीव्ही पॅमेरा फुटेज तसेच घटनास्थळी आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही पॅमेराची पडताळणी पोलीस घेत आहेत. ठसेतज्ञ श्वानपथकाचा वापर करण्यात आला आहे. श्वान रस्त्याच्या बाजूने खाली मुख्य रस्ता, शेतीमध्ये जाऊन परतले त्यामुळे संशयित आरोपी त्याबाजूनी पळल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलीस अधीक्षक उत्कर्ष प्रसन्नू, गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक शेखर प्रभूदेसाई यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी मार्गदर्शन केले.
अन्य दोघां संशयितांना कसे कळले?
रुग्णवाहिका आरोपीला न घेताच कशी गेली
रात्रीच्यावेळी विवेक गौतम तुरुंगातून म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात तपासणीसाठी येणार हे अन्य दोघा संशयितांना कसे कळले, ते आझिलोच्या बाहेर पूर्व तयारीनिशी कसे आले, रुग्णवाहिका चालक युवराज शिंदे संशयिताला आझिलोतून पुन्हा तुरुंगात नेल्याशिवाय का गेला? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. विवेकवर पर्वरी व हणजूण पोलीस स्थानकामध्ये खंडणी, चोरी, सोनसाखळी पळविणे आदी गुन्हे नोंद आहेत. आग्रा येथे गुह्यामध्येही त्याचा समावेश आहे, अशी माहिती हाती लागली आहे.
वैद्यकीय सेवा नसल्याने संशयिताचे फावले
आग्वाद तुरुंगामध्ये सध्या डॉक्टर उपलब्ध होत नसल्याचे चौकशीअंती उघड झाले आहे. चार दिवसापूर्वी तुरुंगात शैलेश मापारी यांचा मृत्यू झाला. त्यापूर्व रात्री त्याला उलटय़ा व पोटात दुखत होते. त्यांनी तेथील अधिकाऱयांना सांगितले मात्र त्यांची विचारपूस अधिकारीवर्गांने केली नाही. तेथे डॉक्टर नसल्याने दुसऱया दिवशी सकाळी म्हापसा जिल्हा आझिलो इस्पितळात आणण्यात आले. उपचार घेत असतानाच त्याचा आझिलोत मृत्यू झाला होता.
तुरुंगात पूर्णवेळ डॉक्टर असणे बंधनकारक आहे मात्र येथे कुणीच डॉक्टर उपलब्ध नसल्याने तुरुंगातून कैद्यांना घेऊन म्हापसा जिल्हा आझिलोत तपासणीसाठी यावे लागते, यातूनच कैद्यांना अशा रितीने पूर्वनियोजन करून पळता येते. जर येथे डॉक्टर्स उपलब्ध असते तर ही पाळी आज आली नसती अशी माहिती सूत्रांनी दिली. प्रशासनाचे याकडे काहीच लक्ष नसल्याचे आढळून आले आहे. तेथे डॉक्टर असल्यास आरोपींना बाहेर काढण्याची आवश्यकताच भासणार नाही, असे सांगण्यात आले.
तुरुंग अधिकारी पेडणेकर यांचे प्रशासनाकडे दुर्लक्ष
भानुदास पेडणेकर हे येथे तुरुंग अधिकारी म्हणून काम पाहतात, मात्र त्यांचे याकडे काहीच लक्ष नसल्याची माहिती येथील सूत्रांनी दिली. रात्रीच्यावेळी येथे जेलगार्ड दारू प्राशन करून डय़ुटीवर जातात, त्यांची परिस्थिती अशी असते की आपल्यास कुठल्या जेलमध्ये डय़ुटी बजावायला पाहिजे याची माहिती नसते. पेडणेकर सायंकाळ झाली की आपली डय़ुटी संपवून घरी जातात, अशी माहिती चौकशीअंती उघड झाली असल्याची माहिती पोलीस वरिष्ठ अधिकाऱयांनी पत्रकारांना दिली. येथे सर्व काही सावळा गोंधळ चालल्याचे सांगण्यात आले. येथे नेव्ही, कमांडर यांची आवश्यकता आहे. रात्रीच्यावेळी येथे अचानक तपासणी करणे गरजेचे आहे, असे सांगण्यात आले.
रुग्णवाहिका चालकाची कृती संशयास्पद
विवेककुमार याला आझिलो इस्पितळात आणलेल्या रुग्णवाहिकेच्या चालकाभोवती पोलिसांचा संशय धावत आहे. इस्पितळात आरोपीला आणला असता त्याला परत न घेता ती रुग्णवाहिका पुन्हा तुरुंगात का नेली असा प्रश्न समोर आला आहे. येथेच पाल कुठेतरी चुकचुकल्यासारखी होत आहे. त्यादृष्टीने त्या चालकाला ताब्यात घेऊन त्या चालकाची चौकशी पोलीस करीत आहेत. येथूनच या घटनेला वाचा फुटणार आहे. हा पूर्वनियोजित कट होता काय. या पलायनामागे अन्य तुरुंगातील अधिकारी वर्ग जबाबदार आहेत काय? अन्य कोण यात गुंतले आहेत, याची सखोल पोलीस चौकशी होऊन या प्रकरणाला वाचा फुटण्याची शक्यता आहे.
आग्रामध्ये रचला पळण्याचा कट
पोलीस वरिष्ठ अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी विवेक गौतम याला या महिन्याच्या 13 डिसेंबर रोजी आग्रा येथे अन्य एका गुह्यात चौकशीसाठी नेले होते. तेथून 16 डिसेंबर रोजी परत गोव्यात आणले होते. या तीन दिवसांच्या दरम्यान कोलवाळ तुरुंगातून पळ कसा काढावा याबाबत पूर्व नियोजन करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.