चित्रिकरणास अभिनेत्रीने केला प्रारंभ
अलिकडेच लव्ह हॉस्टेल चित्रपटात दिसून आलेली अभिनेत्री सान्या मल्होत्राने आता स्वतःचा आगामी चित्रपट ‘कथल’चे चित्रिकरण सुरू केले आहे. अभिनेत्रीने याची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. चित्रपटात ती महिमा नावाच्या पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

दंगल गर्ल सान्या मल्होत्राने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकौंटवर कथलच्या सेटवरील छायाचित्रांची एक सीरिज शेअर केली आहे. यात कॅमेऱयापासून क्लॅपिंग बोर्ड आणि सान्याची छायाचित्रे सामील आहेत. सान्याच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन यशवर्धन मिश्रा करत आहेत. त्यांचा हा दिग्दर्शकीय पदार्पणाचा चित्रपट असणार आहे. अशोक मिश्रा यांच्यासोबत मिळून यशवर्धन यांनी याची पटकथा लिहिली आहे. चित्रपटाची निर्मिती गुनीत मोंगा, एकता कपूर, अचिन जैन आणि शोभा कपूर करत आहेत.
कथल हा महिला केंद्रीत चित्रपट असून याची कहाणी एका स्थानिक राजकारणाच्या अवतीभोवती घुटमळणारी आहे. चित्रपटात अभिनेता अनंत जोशी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. सान्या या चित्रपटाद्वारे नेटफ्लिक्स ओटीटी प्लॅटफॉर्मवर पुन्हा परतणार आहे. यापूर्वी तिने नेटफ्लिक्सच्या लूडो, पगलैट आणि मीनाक्षी सुंदरेश्वर या चित्रपटांमध्ये काम केले होते. कथलबरोबरच सान्या द ग्रेट इंडियन किचन चित्रपटात दिसून येणार आहे.