नरसोबावाडी रोडवरील घटना
शिरोळ : प्रतिनिधी
जबरदस्तीने सोन्याची चेन व अंगठी असे ५० हजार रुपयाचे दागिने अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना शनिवारी सकाळी सातच्या सुमारास शिरोळ-नृसिंहवाडी मार्गावर घडली. याबाबतची फिर्याद अशोक धोंडीराम खोचरे (वय ५९, रा. संभाजीनगर; नृसिंहवाडी) यांनी शिरोळ पोलिस ठाण्यात दिली.
खोचरे हे सकाळी फिरायला गेले होते. नृसिंहवाडी-शिरोळ रस्त्याने चालत जात असताना जगदाळे सरकार यांचे झुणका भाकरी केंद्राच्या पुढे खांडसरी जवळ आल्यानंतर पाठीमागून दोघे मोटरसायकलस्वार आले. पोलीस असल्याचे सांगून आम्हाला कारवाई करावी लागेल त्यामुळे गळ्यातील चेन व हातातील अंगठी काढून खिशामध्ये ठेवण्यास सांगितले. चेन व अंगठी काढून खिशात ठेवत असताना जबरदस्तीने चोरट्यांनी हिसकावून धूम ठोकली.