प्रतिनिधी / इस्लामपूर
इस्लामपूर येथील महाविद्यालयीन युवकाकडून खंडणी उकळून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार करणारा पोलीस कॉन्स्टेबल हणमंत कृष्णा देवकर ३४,रा.राजेबागेस्वारनगर याला मंगळवारी जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम यांनी निलंबित केले. त्याच्या निलंबनासाठीचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांच्या मार्फत पाठवला होता.
देवकर हा दि.२७ ऑक्टोबर रोजी रात्रगस्तीवर असताना पिडीत युवक मैत्रिणीला भेटून पहाटे तीन वाजता आपल्या वसतीगृहात जात होता. दरम्यान देवकर याने त्याला अडवून माहिती घेतली. त्यानंतर दि.२९ ऑक्टोबर रोजी देवकर याने या युवकास फोन करुन कॉलेजच्या गेटवर बोलावून घेतले. प्रेम प्रकरणावरून धमकावून त्याच्याकडून चार हजार रुपये घेताना त्याने या युवकाकडे मैत्रिणीला पाठवण्याबाबत सांगितले.
त्यास नकार दिल्याने त्याला त्याच्याच रुमवर नेवून अनैसर्गिक अत्याचार केला. पुन्हा तो दि.२१ नोव्हेंबर रोजी अनैसर्गिक अत्याचार करण्यासाठी गेला होता. या युवकाने मित्रांची मदत घेवून इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली. पोलीसांनी गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक केली.
त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दरम्यान सोमवारी पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी पोलीस उपाधिक्षक पिंगळे यांच्या वस्तुनिष्ठ अहवालाच्या आधारे जिल्हा पोलीस प्रमुख गेडाम यांच्याकडे प्रस्ताव पाठवला. पोलीस प्रमुख गेडाम यांनी मंगळवारी देवकर याच्या निलंबनाचे आदेश केले.