प्रतिनिधी / बेळगाव
पोलीस भरती प्रक्रियेत फसवणूक करून शारीरिक चाचणीला भलताच उमेदवार हजर करून भलत्याच तरुणाची पोलीस दलात भरती केल्याप्रकरणी रविवारी मार्केट पोलिसांनी गोकाक तालुक्मयातील दोघा जणांना अटक केली आहे. धारवाड येथील आणखी एक तरुण बेपत्ता असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱयांनी लक्ष्मण वेंकण्णा होसकोटी (वय 27) रा. कळ्ळीगुद्दी, ता. गोकाक, सचिन गुग्गरी (वय 21) रा. घटप्रभा, ता. गोकाक या दोघा जणांना अटक केली आहे. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन व उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.
16 डिसेंबर 2020 रोजी जिल्हा पोलीस मैदानावर पात्र उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. त्या दिवशी शारीरिक चाचणीत भाग घेऊन सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करणारा तरुण भलताच होता. नंतर पोलीस दलात भरती झाली म्हणून 26 फेब्रुवारी रोजी पोलीस मुख्यालयात रुजू होण्यासाठी आलेला लक्ष्मण होसकोटी हा मूळ अर्जदार होता.
शारीरिक चाचणीवेळी प्रत्येक उमेदवाराचे व्हिडिओ चित्रिकरण केले जाते. हजर होण्यासाठी लक्ष्मण ज्यावेळी पोलीस मुख्यालयात आला, त्यावेळी अधिकाऱयांनी कागदपत्रांची पडताळणी करताना संशय येऊन शारीरिक चाचणीचा व्हिडिओ पाहिला असता चाचणीत भाग घेणारा वेगळा आणि भरती झालेला तरुण वेगळा असल्याचे उघडकीस आले होते.
या प्रकरणी जिल्हा पोलीस मुख्यालयातील साहाय्यक प्रशासकीय अधिकारी मनोज मधुकर लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी लक्ष्मण व त्याचा साथीदार सचिन या दोघा जणांना रविवारी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.