शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणूक
प्रतिनिधी/ निपाणी
मुदत संपलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी गेल्या 15 दिवसांपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शुक्रवारी जाहीर प्रचाराची सांगता झाली असून गुप्त बैठकांना जोर आला आहे. जिल्हय़ात एकूण 16 शहरी स्वराज्य संस्थांसाठी 27 रोजी मतदान होणार आहे. यात प्रामुख्याने अथणी, उगार खुर्द या नगरपरिषदा तर एकसंबा, बोरगाव या नगरपंचायतींचा समावेश आहे.
अथणी नगरपरिषदेच्या 27 जागांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. हारुगेरी येथील 23, मुगळखोड 22, मुनवळ्ळी 23, उगार खुर्द 23, एम. के. हुबळी 11, कंकणवाडी 17, नागनूर 17, एकसंबा 17, कित्तूर 18, ऐनापूर 19, शेडबाळ 16, चिंचली 19, बोरगाव 17 व कल्लोळ नगरपंचायतीच्या 16 जागांसाठी सोमवारी निवडणूक होणार आहे. जिल्हय़ात एकूण 470 जागांसाठी 1253 उमेदवार रिंगणात आहेत.
सदर निवडणुकीसाठी 15 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. 18 रोजी झालेल्या माघारीनंतर रिंगणात राहिलेल्या उमेदवारांनी गेल्या आठ दिवसांत जाहीर प्रचाराच्या माध्यमातून मतदारांना विनवणी केली. संबंधित मतदारसंघांतील लोकप्रतिनिधीनींही सदर नगरपरिषद तसेच नगरपंचायतांच्या निवडणुकीत प्रचारफेरीच्या माध्यमातून उमेदवारांसाठी मतयाचना केली. त्याचा कितपत परिणाम झाला हे 30 रोजी समजणार आहे.