नेताजींच्या जयंतीपासून सोहळय़ाला प्रारंभ : केंद्र सरकारचा निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रजासत्ताक दिनाचा उत्सव आता 24 जानेवारीऐवजी 23 जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मदिनाचा समावेश करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाला होता. मोदी सरकार देशाच्या इतिहास आणि संस्कृतीतील महत्त्वाच्या बाबींचा सन्मान आणि उत्सव करण्यावर भर देत आहे. याच धर्तीवर प्रजासत्ताक दिन सोहळय़ाच्या कालावधीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने उचललेल्या पावलांचे देशातील जनता स्वागत करते. पण आजच्या काळात नेताजींच्या विचारसरणीचा राजकारणात समावेश करणे अधिक गरजेचे आहे. याबाबत मी पंतप्रधान मोदींना पत्रही लिहिल्याचे नेताजींचे पणतू चंद्र कुमार बोस यांनी सांगितले. नेताजी हे लोकांना त्यांच्या धर्मांशिवाय भारतीयतेच्या आधारावर एकत्र करू शकणारे एकमेव नेते होते. नेताजींची विचारधारा अंगिकारली नाही, तर भारताचे पुन्हा तुकडे होतील, असेही ते पुढे म्हणाले.
चंद्र बोस यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात भारतासमोर नेताजींचा पुतळा आणि लाल किल्ल्यावर स्मारक उभारण्याची मागणी केली होती. नेताजींना खरी श्रद्धांजली हीच त्यांच्या विचारसरणीचा देशात समावेश करून फाळणीच्या राजकारणाविरुद्ध लढा देऊन देशात बंधुभाव आणणे होय. जात, वर्ग किंवा धर्माच्या नावावर लोकांमध्ये भेदभाव होऊ नये अशी त्यांची इच्छा होती, असेही चंद्र बोस यांनी पत्रातून सांगितले होते.
सरकारी पातळीवर यापूर्वी जाहीर झालेले काही महत्त्वाचे दिवस…
14 ऑगस्ट – फाळणी विभीषिका स्मृती दिवस
31 ऑक्टोबर – राष्ट्रीय एकता दिवस
15 नोव्हेंबर – आदिवासी अभिमान दिवस
26 नोव्हेंबर – संविधान दिन
26 डिसेंबर – वीर बाल दिवस