दिल्लीवासीय दुहेरी संकटाच्या विळख्यात
पातळीवर पोहोचली आहे. हवेची गुणवत्ता दूषित होत आहे. देशात वायू प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने आणलेला अध्यादेश लागू करण्यात आला, परंतु त्यानंतरही प्रदुषणात कोणतीही घट झालेली नाही. वाढत्या प्रदुषणामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. डोळय़ांच्या समस्याही वाढल्या आहेत. बऱयाच राज्यांत धुक्यामुळे डोळय़ांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत. शेतांमधील गवत जाळल्यामुळे निर्माण झालेल्या धुरामुळे अनेक भागात दृश्यमानताही कमी होत आहे. त्यातच वाढत्या प्रदुषणामुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असल्याचा इशारा वैद्यकीय तज्ञांनी दिल्यामुळे लोकांमध्ये अधिकच भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या इशाऱयाचा आधार घेत दिल्ली सरकारसह अन्य राज्यांनीही प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. दिल्लीत औद्योगिक प्रदूषण टाळण्यासाठी उद्योगांवर निर्बंध आणण्यात आले आहेत. दिल्लीसह राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि हरियाणा या राज्यांनी फटाक्यांवर बंदी घातली आहे. तसेच कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांनीही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची घोषणा केली आहे.
वाढत्या प्रदुषणामुळे उत्तरेकडील बहुतेक राज्यात हवेची गुणवत्ता खालावली आहे. पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, नवी दिल्ली आणि मध्यप्रदेशात वायू प्रदूषण परिस्थिती अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये परिस्थिती आटोक्याबाहेर गेलेली आहे. दिल्लीची हवा अत्यंत निकृष्ट पातळीवर पोहोचली आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्मयूआय) घसरत चालला आहे. दृश्यमानताही बरीच रोडावली आहे. दिल्लीला लागून असलेली शहरेही वाईट स्थितीत आहेत. गुरुग्राममध्ये हवेची गुणवत्ता पातळी 469 तर नोएडामध्ये 458 पर्यंत पोहोचली आहे. गाझियाबादमध्ये हवेची गुणवत्ता पातळी 469 आणि फरिदाबादमध्ये 421 इतकी असल्याचे दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीच्या अहवालातून दिसून येत आहे. दुसरीकडे हवामानशास्त्रज्ञांनी येत्या काही दिवसांत वायू प्रदूषणात सुधारणा होण्याची शक्मयता नाही, अशी भीतीही व्यक्त केली आहे. हवामानतज्ञांच्या म्हणण्यानुसार जर ही परिस्थिती कायम राहिली तर लवकरच दिल्ली-एनसीआरमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. हिवाळय़ाच्या आधी दरवर्षी पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील शेतकऱयांकडून भातपेंडय़ा जाळल्या जात असल्यामुळे या राज्यांसह दिल्लीतील वायू प्रदुषणाची समस्या वाढते. प्रदुषणाची पातळी इतकी वाढते की, लोकांना श्वासोच्छवास घेणेही कठीण बनते. कोरोनाचा संसर्ग सर्वत्र पसरत असताना प्रदुषणाचा धोका जास्तच वाढला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे.
वाहनांपासून होणारे प्रदूषण
भारतात गेल्या काही वर्षात वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने अतिसूक्ष्म धूलिकणांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. भारतातील सर्वच मोठी शहरे या प्रदुषणाच्या विळख्यात असून दिल्ली, कानपूर, मुंबई, पुणे, बेंगळूर ही शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांत मोडतात. वाहनांपासून तयार होणाऱया प्रदुषणामुळे एकूणच सामाजिक आरोग्यावर होत आहे. डॉक्टरांकडे येत असलेली सर्दी, ताप, पडसे, दमा इत्यादी तक्रारिंकरिता वाढलेली गर्दी हे याचे प्रतीक आहे. हे रोग अतिघातक नसले तरी सातत्याच्या प्रादुर्भावाने माणसाची शारीरिक व मानसिक क्षमता कमी करण्यात हातभार लावतात.
प्रदुषणाच्या विळख्यातील निवडक राज्यांची स्थिती…
दिल्ली : दुहेरी संकटामुळे दिल्लीवाल्यांसाठी चारही बाजूने अडचणी निर्माण झाल्या आहेत. घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे. कोरोनाच्या वाढणाऱया विक्रमी केस आणि वाढते प्रदूषण असे दुहेरी संकट आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये शेतात सुकलेले गवत जाळल्याने दिल्लीची हवा अतिशय खराब स्थितीत पोहचली आहे. दिल्लीचा एक्मयूआय 300 च्या पुढे गेला आहे. अशावेळी दिल्लीत लोकांना श्वास घेण्यास त्रास होण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत आहे. या दरम्यान सणाचा सीझन असल्याने बाजारात होणाऱया गर्दीने कोरोनाचा धोका आणखी वाढवला आहे.
पंजाब : पंजाबची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. येथील हवामानही सतत दूषित होत आहे. चंदीगडमधील हवा इतर शहरांप्रमाणेच विषारी बनत चालली आहे. त्याचबरोबर जालंधरमधील प्रदुषणाची पातळीही लक्षणीय वाढली आहे. पटियालातील प्रदूषणामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. वायू प्रदुषणामुळे येथील लोकांमध्ये श्वास घेण्याच्या समस्या बळावल्या आहेत.
हरियाणा : पंजाबप्रमाणेच हरियाणामध्येही हवामान धोकादायक होत आहे. येथे श्वास घेणे देखील कठीण झाले आहे. राज्यातील तीन शहरांमध्ये हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्मयूआय) 400 पर्यंत पोहोचला आहे. येथे अंबाला देशातील सर्वात प्रदूषित शहर बनले आहे. येथील एक्मयूआय 452 पर्यंत पोहोचला आहे.
उत्तर प्रदेश : ‘ताज नगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱया उत्तर प्रदेशमधील आग्रा शहरात हवेची गुणवत्ता अत्यंत खराब बनत आहे. अलीकडेच येथे 276 इतका गुणवत्ता निर्देशांक (एक्मयूआय) येथे नोंदविला गेला आहे. हवामानातील खराबीमुळे फुफ्फुस, दमा आणि श्वासोच्छवासाचा त्रास जाणवणाऱया रुग्णांच्या समस्या आणखीनच जटील बनत चालल्या आहेत.
हरित लवादाकडून राज्यांना सूचना

राष्ट्रीय हरित लवादाने प्रदुषणाच्या समस्येबाबत राज्यांना वेळोवेळी सतर्क केलेले आहे. फटाक्मयांमुळे होणाऱया प्रदुषणाच्या प्रकरणांची सुनावणी सुरू असताना राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने 18 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटिसा बजावल्या आहेत. या राज्यांची हवा गुणवत्ता मानकांपेक्षा कमी असल्याचे नोंदविण्यात आले आहे. एनजीटीचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने यापूर्वी दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश यांना नोटीस बजावल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाकडूनही दखल

दिल्ली-एनसीआरमधील वाढत्या वायू प्रदुषणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नवीन समिती स्थापन केली आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात भातपेंडय़ांना जाळण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यावर नजर ठेवण्यासाठी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन बी. लोकुर यांची एक सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिल्लीतील सर्व अधिकारिणी व पर्यावरण प्रदूषण (प्रतिबंध व नियंत्रण) प्राधिकरणाच्या अधिकाऱयांना न्या. लोकुर समितीला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. दोन तरुण पर्यावरणतज्ञांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा हा आदेश आला आहे.
प्रदुषणापासून कशी काळजी घ्यावी!
हवा प्रदुषणामुळे त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्वचा संबंधित अनेक रोग होऊ शकतात. वास्तविक, वायू प्रदुषणामुळे श्वास घेण्यात त्रास होत असतानाच त्वचा कोरडी पडत जाते. त्वचेतील ओलावा कमी होऊन लालसरपणा वाढतो. वायू प्रदुषणामुळे त्वचेचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊन बारीक रेषा, सुरकुत्या आणि डाग पडू लागतात. इतकेच नाही तर चेहऱयावरही डाग दिसू लागतात. वायू प्रदुषणाचा प्रभाव कमी करण्यासाठी नियमित त्वचेची काळजी घ्यावी. तसेच, पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. या सोप्या उपायांचा प्रयत्न करून त्वचा निरोगी ठेवली जाऊ शकते.
उपाययोजना…

भरपूर पाणी प्या : वायू प्रदूषणाच्या परिणामापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी शरीराला हायडेट करा. यासाठी आपण डिटोक्स पाणी, आवळा किंवा तुळशीच्या पानांचे पाणी घेऊ शकता. अशा प्रकारच्या पाण्यामधील आवश्यक द्रव शरीरात जमा होणारे विष बाहेर काढण्यास मदत करतात.
दररोज स्क्रब करा : त्वचा निरोगी ठेवण्यासाठी, दररोज ठराविक वेळ स्क्रब केले पाहिजे. यामुळे त्वचेवरील वायू प्रदुषणाचे दुष्परिणाम दूर होतात. घरी स्क्रबसाठी पेस्ट तयार करा. अक्रोड बारीक करून त्यात साखर आणि ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब घाला. ही पेस्ट 10 सेकंद चेहऱयावर घासून घ्या आणि थंड पाण्याने धुवा. हे त्वचेवरील घाण साफ करते आणि वायू प्रदुषणाचा प्रभाव कमी करते.

सनस्क्रीनचा वापर : घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या त्वचेवर सनस्क्रीन लावा. हे धुके कण आणि हानिकारक रसायनांपासून त्वचेचे रक्षण करते. इतकेच नाही तर सनस्क्रीन अतिनील किरणांपासून असलेला धोकाही रोखते.
फेसपॅकचा वापर : वायू प्रदुषणाच्या परिणामापासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी चेहऱयावर फेसपॅक लावायलाच हवा. यातील द्रव्यामुळे चेहऱयावरील काळेपणा दूर होतो. प्रदुषणाचे हानिकारक प्रभाव दूर करण्यासाठी वेगवेगळय़ा प्रकारचे फेसपॅक उपलब्ध असतात. मात्र, त्यांचा वापर करताना वैद्यकीय सल्लाही अवश्य घ्यावा.
कोमट पाण्याने आंघोळ : प्रदुषणाच्या परिणामापासून त्वचेला सुरक्षित ठेवण्यासाठी आठवडय़ातून एक किंवा दोनदा बदाम, लॅव्हेंडर किंवा नारळाच्या तेलाने मसाज करा. यानंतर कोमट पाण्याने आंघोळ करावी. हे त्वचेच्या आत जमा होणारी घाण काढून टाकते आणि एक नैसर्गिक चमक देते.
मानवी आरोग्यावरील परिणाम…
हवा प्रदुषणाचा सर्वात घातक परिणाम श्वसनसंस्थेवर होतो. विविध प्रदूषक घटके श्वसनव्यवस्थेवर हल्ला चढवतात. ओझोन, नायट्रोजन डायऑक्साईड हे फुफ्फुसांवर अतिशय घातक परिणाम करतात. ओझोन फुफ्फुसांमधील पेशींना नष्ट करून फुफ्फुसे कमजोर करतो, त्यामुळे दमा वाढीस लागतो. नायट्रोजन ऑक्साईड हे श्वसन नलिकेत व फुफ्फुसांत गेल्यानंतर फुफ्फुसे व श्वसन नलिका ते विरघळवण्यासाठी जास्तीजास्त कफाची निर्मिती करतात व त्यामुळे आपणास सर्दी होते. ही सर्दी अनेक दिवसांची जुनी झाल्यास जीवाणूंचा संसर्ग होतो व परिस्थिती गंभीर होते. कार्बन मोनॉक्साईड आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहण्याचे काम करणारे हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजनऐवजी मिसळून जातो व शरिरातील सर्व भागात पोहोचतो. हा वायू अत्यंत विषारी असल्याने आरोग्यासाठी फारच बाधक ठरू शकतो.
निसर्गातील इतर घटकांवर परिणाम
केवळ मनुष्यच नव्हे तर निसर्गातील इतर घटकांवर प्रदुषणाचे विपरीत परिणाम होतात. सल्फर डायॉक्साईड व नायट्रोजन डायॉक्साईडमुळे अम्लधर्मी पावसाची निर्मिती होते व त्याचा विपरीत परिणाम जमिनीवर व पिकांवर होतो. ओझोनच्या संपर्कात आल्यामुळे कपडे, गाडय़ांचे रंगही फिके पडतात. ताजमहालसारख्या वास्तूंचे सौंदर्यदेखील वायूप्रदुषणामुळे कमी झाल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. साध्या बांधकामाचे आयुष्यही प्रदुषणामुळे कमी होते.
– जयनारायण गवस