ऑनलाईन टीम/तरुण भारत
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा प्रमोद सावंत यांची निवड पक्षश्रेष्ठींनी केली आहे. प्रमोद सावंत यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवत त्यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केले आहे. तसेच गोवा भाजपचे नेत्यांनी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेत भेट घेतली. तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून ते होळीनंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती ट्वीटरद्वारे दिली आहे.
“आमचा पक्ष गोव्यातील जनतेचा आभारी आहे की त्यांनी आम्हाला पुन्हा राज्याची सेवा करण्याचा जनादेश देऊन आशीर्वाद दिला. आम्ही आगामी काळात गोव्याच्या प्रगतीसाठी काम करत राहू,” असे ट्विट पंतप्रधानांनी केले.
राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची भेट घेण्यासाठी मंगळवारी दिल्लीला रवाना झाले होते. आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी संसदेत दाखल झाले. तर गोवा राज्याच्या आठव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला मंगळवारी 39 नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीने सुरुवात झाली.