नवी दिल्ली/प्रतिनिधी
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार सुरु आहे. याच संदर्भात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेकवेळा बैठकाही घेतल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस प्रवेशाचे विविध तर्क लावले जात असताना किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या प्रमुख सल्लागार पदावरुन राजीनामा दिला आहे. पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. अशावेळी प्रशांत किशोर यांनी राजीनामा दिला आहे. याच वर्षी प्रशांत किशोर अमरिंदर सिंग यांचे प्रमुख सल्लागार बनले होते आणि त्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा देण्यात आला होता. पण निवडणुकीच्या तोंडावर प्रमुख सल्लागार पदाचा राजीनामा दिल्याने अमरिंदर सिंग यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
दरम्यान, प्रशांत किशोर यांनी पत्र लिहून त्यांनी आपल्या राजीनाम्यामागचं कारण सांगितलं आहे. त्यांनी म्हंटल आहे की सार्वसजिक जीवनातील सक्रिय भूमिकेतून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी आपला प्रमुख सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळण्यास सक्षम नाही. मला माझ्या भविष्यातील कार्याबाबत निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की मला जबाबदारीतून मुक्त करण्याची कृपा करावी. या पदावर माझी निवड करण्यासाठी आणि मला संधी देण्यासाठी मी तुमचे आभार मानतो.’