ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने ठोठावलेला एक रुपयांचा दंड त्यांनी सोमवारी भरला.
न्यायालयाच्या अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने एक रुपया दंडाची शिक्षा ठोठावली होती. 15 सप्टेंबरपर्यंत दंडाची ही रक्कम न भरल्यास भूषण यांना तीन महिने तुरूंगवास आणि तीन वर्षे वकिली करण्यावर बंदी घालण्यात येईल, असेही न्यायालयाने म्हटले होते. सोमवारी भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात दंडाचा एक रुपया भरला. मात्र, दंड भरला म्हणजे न्यायालयाचा निकाल मी स्वीकारला आहे असे होत नाही, असे भूषण यांनी म्हटले आहे.
भूषण यांनी आपल्यावर दाखल असलेल्या अवमानविषयक खटल्यावर अपील करण्याचा अधिकार आहे, असे मत मांडत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात फेरविचार याचिका दाखल केली आहे.
काय आहे प्रकरण?
जून 2019 मध्ये प्रशांत भूषण यांनी ट्विट करून सरन्यायाधीश शरद बोबडे व सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्यापूर्वीही त्यांनी चार माजी मुख्य न्यायमूर्तींवर टीका केली होती. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने भूषण यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे.