वृत्तसंस्था/ कराची
झिंबाब्वेचा क्रिकेट संघ पाकच्या दौऱयावर जाणार आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू लालचंद रजपूत झिंबाब्वे क्रिकेट संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे. दरम्यान हरारेतील भारतीय वकिलातीतर्फे लालचंद रजपूतला पाकच्या दौऱयावर न जाण्याची विनंती करण्यात आली होती. या विनंतीमुळे प्रशिक्षक रजपूतने झिंबाब्वे संघाबरोबर पाकच्या दौऱयावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रशिक्षक लालचंद रजपूतच्या गैरहजेरीत झिंबाब्वे संघ पाकच्या दौऱयावर जाणार असल्याची माहिती झिंबाब्वे क्रिकेट मंडळाने दिली आहे. झिंबाब्वे संघ पाक बरोबर तीन वनडे आणि तीन टी-20 सामने खेळणार आहे. रावळपिंडीत 30 ऑक्टोबरला उभय संघातील पहिला वनडे सामना खेळविला जाणार आहे. झिंबाब्वे संघाचे मंगळवारी पाकमध्ये आगमन झाले आहे. 2018 च्या ऑगस्टमध्ये लालचंद रजपूतची झिंबाब्वे क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी पूर्ण वेळेसाठी नियुक्ती करण्यात आली होती. 1985 आणि 1987 च्या कालावधीत लालचंद रजपूतने दोन कसोटी आणि चार वनडे सामन्यांत भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. 205 नंतर झिंबाब्वे संघाचा पाकचा हा पहिला दौरा आहे.