ऑनलाईन टीम / बेंगळूर :
प्रसिद्ध कन्नड अभिनेते राजेश यांचे शनिवारी पहाटे बेंगळूर येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते किडनी, श्वसन आणि वयाशी संबंधित आजारांमुळे त्रस्त होते. 9 फेब्रुवारी रोजी बेंगळूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
अभिनेते राजेश यांचा जन्म 15 एप्रिल 1935 रोजी बंगळुरूमध्ये झाला. सुरुवातीपासूनच त्यांचा अभिनयाकडे कल होता. त्यांचे मूळ नाव मुनी चौडप्पा तर स्टेजवरचं नाव विद्यासागर होतं. तरीही लोक त्यांना राजेश नावाने ओळखत होते. 1960 च्या उत्तरार्धात आणि 1970 च्या सुरुवातीस त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत 150 चित्रपटांमध्ये काम केले आहे. पुढच्या आठवडय़ात प्रदर्शित होणाऱया ओल्ड मॉन्क या चित्रपटात ते दिसणार होते. त्यांच्या या प्रशंसनीय कार्याची दखल घेत कर्नाटक विद्यापीठानेही त्यांना मानद पदवी देऊन गौरविले होते.
राजेश यांनी शक्ती नाटक मंडळी नावाचा स्वतःचा नाटय़गटही स्थापन केला होता. निरुदयोगीय बालू, बडवाना बालू, विशा सरपा, नंदा दीपा, चंद्रोदय ही त्यांची काही गाजलेली नाटकं आहेत.