रेणुका मंदिर, कपिलेश्वर मंदिरासह कापड दुकानात चोरीचे प्रकार : गणेशनगर येथे घर फोडले, आठ लाखाचा ऐवज लंपास

प्रतिनिधी /बेळगाव
शहर व उपनगरांमध्ये चोऱया, घरफोडय़ांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर समर्थनगर येथील श्री रेणुका यल्लम्मादेवी मंदिरात चोरीचा प्रकार घडला आहे. याचवेळी दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरातही चोरीचा प्रयत्न झाला आहे. सिव्हिल हॉस्पिटलजवळील एका ब्रँडेड कपडय़ांच्या शोरुममध्ये चोरी झाली आहे. तर गणेशनगर परिसरात घरफोडीची घटना झाल्याचे उघडकीस आले आहे.
एका रात्रीत चारहून अधिक चोऱया, घरफोडय़ांच्या घटना घडल्या असून त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. समर्थनगर येथील छत्रपती शिवाजी उड्डाण पुलाखालील श्री रेणुका यल्लम्मादेवी मंदिराचा कडीकोयंडा तोडून देवीच्या अंगावरील दागिने चोरटय़ांनी पळविले आहेत. रविवारी सकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला आहे.
अडीच वर्षात पुन्हा मंदिरात झाली चोरी
यासंबंधी राहुल मुचंडी यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. 2019 मध्ये याच मंदिरात चोरीची घटना घडली होती. अडीच वर्षात पुन्हा मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. चोरटय़ांनी सुमारे 45 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र, देवीची नथ, सुमारे 61 हजार रुपये किमतीचे चांदीचे किरीट, 15 हजार रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा, सुमारे 25 हजार रुपये किमतीची प्रभावळ असे दीड लाखाहून अधिक किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लांबविले आहेत.
घटनेची माहिती समजताच मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळशीगेरी, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. मार्केट पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
गणेशनगर येथे घरफोडी
एपीएमसी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात गणेशनगर येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे आठ लाखाहून अधिक किमतीचा ऐवज चोरटय़ांनी पळविला आहे. रविवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
यासंबंधी जयंत हेरेकर यांनी फिर्याद दिली आहे. 28 जानेवारीच्या रात्रीपासून 30 जानेवारीच्या सकाळपर्यंतच्या काळात ही घटना घडली आहे. चोरटय़ांनी कडीकोयंडा व सेंटरलॉक तोडून घरात प्रवेश केला आहे. बेडरुममधील कपाट उघडून 60 ग्रॅमचे सोन्याचे दागिने, 3 किलो चांदी, साडेचार लाख रुपये रोख रक्कम पळविल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
घटनेची माहिती समजताच एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. एपीएमसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
कापड दुकानात चोरी
सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील एका ब्रँडेड कापड दुकानात चोरीची घटना घडली आहे. पेंटॅलून्स शोरुममध्ये चोरीची ही घटना घडली असून चोरटय़ांनी गल्ल्यातील 1 लाख 37 हजार रुपये रोकड पळविली आहे. यासंबंधी रामकृष्ण सेठ यांनी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे.
कपिलेश्वर मंदिरात प्रयत्न
दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरातही चोरीचा प्रयत्न झाला आहे. मंदिराच्या पाठीमागच्या दरवाजाने मंदिरात प्रवेश करण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या कॅमेऱयात हा प्रकार कैद झाला असून मार्केट पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे. एका रात्रीत घडलेल्या चोऱया, घरफोडय़ांच्या प्रकाराने शहरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी केली जात आहे.