वार्ताहर / राशिवडे
प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान जाहीर केले. ते कुठे गेले. ते आधी सांगावे मगच पदवीधर उमेदवारांना मते मागायला सामोरे जावे असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ राशिवडे येथे आयोजित प्रचार सभेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
पाटील पुढे बोलताना म्हणाले, पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख हाच पदवीधरांची समस्या सोडवण्यासाठी योग्य आहे. म्हणूनच पदवीधरांची पहिली पसंती ही संग्राम देशमुख यांना मिळणार हे निश्चित आहे. पुणे विभागातील पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी संग्राम देशमुख यांच्यासारख्या तरुण उमेदवार निवडून देणे गरजेचे असल्याचे राशिवडे भाजपाचे अध्यक्ष संजय पवार यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात केले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल देसाई आदी पदवीधर मतदार उपस्थित होते.