वर्दीला हात घालत शिवीगाळ व दमदाटी, मंगेश आवळेसह पाच जणांवर गुन्हा दाखल
प्रतिनिधी /फलटण
येथील शहर पोलीस ठाण्यात दाखल तक्रार अर्जाबाबत माहिती घेण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांच्या वर्दीला हात घालत त्यांच्या शर्टची बटणे तोडून शिवीगाळ व दमदाटी करत शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळलेल्या माहितीनुसार, दिनांक 18 रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास फलटण शहर पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक अमोल आनंदा कदम व दप्तरी पो. ना. वाडकर असे दैनंदिन काम करत असताना फलटण शहर पोलीस ठाण्यात अर्जदार राम वसंत पवार (रा. सोमवार पेठ, फलटण) यांचा दाखल अर्ज चौकशी करिता अर्जदार राम पवार व त्यांचा भाऊ लखन वसंत पवार हे सकाळी 12.30 वाजण्याच्या सुमारास हे पोलीस ठाण्यामध्ये आले होते. त्यांच्यासोबत मंगेश प्रमोद आवळे, उमेश नरसिंह पवार, रोहित संतोष अडागळे, राकेश राजेश पवार हे पोलीस उपनिरीक्षक अमोल आनंदा कदम हे शासकीय काम करत असलेल्या कक्षात आले. त्यावेळी अर्जदार यांना रुममध्ये थांबवुन बाकी सोबत आलेल्या व्यक्तींना बाहेर बाकडय़ावर बसण्याची विनंती कदम यांनी केली असता सोबत आलेले व्यक्ती रुममध्येच थांबले. व अर्जातील मजकुरा प्रमाणे अर्जदार यांच्याकडे कदम चौकशी करत असताना मंगेश आवळे हा पोलीस अधिकारी कदम यांच्या अंगावर धावुन जावून कदम यांच्याशी अर्वाच्च भाषेत मोठमोठय़ाने बोलत होता. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक कदम यांनी मंगेश यांस आम्ही अर्जदार याच्याशी चर्चा करत आहे तुम्ही तुमचे म्हणणे नंतर द्या असे म्हणाले असता त्यावेळी मंगेश आवळे म्हणाला की, तुला माहीत आहे का? मी कोण आहे. मी महाराष्ट्र समाज आझाद पार्टी या संघटनेचा उपाध्यक्ष आहे, मी एस. पीं.कडे जाईल, मला कमी समजू नका असे डोळे वटारुन जोरजोरात पोलीस उपनिरीक्षक कदम यांच्याकडे बघून बोलत होता.
यानंतर कदम हे करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून त्यांचे शासकीय गणवेशाचे बटणे तोडून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी राम वसंत पवार, लखन वसंत पवार, मंगेश प्रमोद आवळे, उमेश नरसिंह पवार, रोहित संतोष आडागळे, राकेश राजेश पवार (सर्व रा. सोमवार पेठ फलटण) या सहा जणांच्या विरोधात पोलीस उपनिरीक्षक अमोल आनंदा कदम यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहा जणांना तत्काळ अटक करण्यात आली असून या गुह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड करीत आहेत.