बेळगाव / प्रतिनिधी
ओसाड माळ, मैदानात किंवा खुल्या जागेत लहान मुले रोज सायंकाळी खेळण्यासाठी जातात. मात्र, या ठिकाणी झाडेझुडुपे वाढून किडीचा व डासांचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात वाढल्यामुळे लहान मुलांना मलेरिया, डेंग्यू यासारखे आजार होत आहेत. याची दखल घेऊन फलोत्पादन विभाग व महापालिकेच्यावतीने लेले ग्राउंडची स्वच्छता केली आहे.
दुपारी चारनंतर सर्वच मुले टिळकवाडी परिसरातील लेले ग्राउंडवर खेळण्यासाठी जातात. काही मुले या ठिकाणी सरावासाठीही येतात. या मैदानात गवत वाढले आहे. पावसाचे पाणी साचून डासांचा प्रादुर्भावही मोठय़ा प्रमाणात झाल्याने खेळायला गेलेल्या मुलांचा डासांनी चावा घेतल्यावर शरीरावर लाल पुरळ येत आहेत. यामुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता.
यावेळी आनंद कोलकार, वसंत हेब्बाळकर, विजय भातकांडे यांच्या पुढाकाराने या मैदानाची स्वच्छता करून औषध फवारणी करण्यात आली. यावेळी फलोत्पादन विभाग व महानगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.