क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत आज सोमवारी फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर चेन्नईन एफसीची आघाडीवरील मुंबई सिटी एफसीविरूद्ध लढत होईल. सध्या 12 सामन्यांत मुंबई सिटी एफसीने 9 विजय नोंदविले असून दोन बरोबरीमुळे त्यांचे 29 गुण झाले आहेत. चेन्नईन एफसीचे 13 सामन्यांतून तीन विजय व सहा बरोबरीने 15 गुण झाले आहेत.
चेन्नईनच्या संघाची कामगिरी खालावली आहे. त्यामुळे प्रशिक्षक क्साबा लॅसझ्लो चिंतेत आहेत. 13 सामने होऊनही चेन्नईनच्या आघाडीफळीला अद्याप फॉम गवसलेला नाही. सहाव्या स्थानावर असलेल्या या संघाला आतापर्यंत केवळ दहा गोल करता आले आहेत, जे सहभागी संघांमध्ये सर्वांत कमी आहेत. मागील लढतीत त्यांना एटीके मोहन बागानने एकमेव गोलने नमविले होते. त्यामुळे सामन्यात एकही गाशल न होण्याची त्यांची अपयशी मालिका सातपर्यंत वाढली आहे.
अशाबेळी दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईनला अकरा सामन्यांत अपराजित असलेल्या मुंबई सिटी एफसीच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. मुंबईचा बचावही स्पर्धेत सर्वाधिक भक्कम आहे. मुंबईविरूद्ध आतापर्यंत चारच गोल झाले आहेत. अशावेळी आपल्या आघाडीफळीने पुढाकार घेऊन कामगिरी उंचावण्याची गरज असल्याचे लॅसझ्लो म्हणाले.
पहिल्या लेगमध्ये मुंबई सिटीने चेन्नईन एफसीला 2-1 असे हरविले होते. त्यावेळी चेंडूवर वर्चस्व मात्र चेन्नईनचे होते आणि त्यांनी जास्त संधी निर्माण केल्या होत्या. आम्हाला मुंबईचा बचाव मोडून काढावा लागेल, असे लॅसझ्लो म्हणाले. पहिल्या सामन्यात वापरलेल्या डावपेचांची योजन आमच्याकडे आहे. तेव्हा आम्ही जवळपास यशस्वी ठरलो होते, पण दुर्दैवाने निकाल आमच्या बाजूने लागला नाही, असे लॅसझ्लो म्हणाले.
दुसरीकडे मुंबई सिटीचा संघ पाच गुणांनी आघाडीवर आहे. लीगमधील त्यांचे अव्वल स्थाथ जवळजवळ निश्चित आहे. प्रशिक्षक सर्जिओ लॉबेरा संघाच्या कामगिरीविषयी समाधानी आहेत, पण कोणत्याही क्षणी परिस्थिती पालटू शकते याची त्यांना जाणीवही आहे. आमच्या कामगिरीची आकडे चांगले आहे आणि आम्ही गुणतक्त्यात आघाडीवर आहोत.