प्रतिनिधी /मडगाव
फातोर्डा येथील श्री दामोदर (लिंग) देवस्थानात काल महाशिवरात्री उत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात आला. कोविड महामारीमुळे गेली दोन वर्षे हे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. ते काल महाशिवरात्री निमित्त भाविकांसाठी खुले करण्यात आले. काल सकाळपासूनच देव दर्शनासाठी भाविकांची गर्दी होती.
देवस्थान समितीचे अध्यक्ष अमरेश नाईक यांनी दिलेल्या माहिती प्रमाणे, कोविड महामारीमुळे गेली दोन वर्षे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. मात्र, भाविक दर सोमवारी व अन्य उत्सवाच्या दिवशी मंदिराच्या बाहेरूनच श्रींचे दर्शन घेत होते. काल महाशिवरात्री निमित्त मंदिर पुन्हा खुले करण्यात आले.
महाशिवरात्रीला याठिकाणी दर वर्षी भाविकांच्या भल्या पहाटेपासूनच रांगा लागायच्या. हजारो भाविक श्रींचे दर्शन घेत असे. मात्र, कोविड महामारीमुळे मर्यादा आल्या होत्या. काल सुद्धा भाविकांनी उपस्थिती लावली तरी पूर्वी प्रमाणे प्रतिसाद नव्हता.