वार्ताहर/ कुडाळ
कुडाळ (ता.जावली) येथील अंगणवाडीमध्ये फायबर प्लॅस्टिक मिश्रित तांदूळ चिमुरडय़ांनी खाल्ल्याने त्यांना बाधा झाली असल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घटना घडल्याने एकच खळबळ माजली आहे. गावातील माजी सरपंचसह ग्रामस्थांनी याबाबत या घटनेचा पर्दाफाश केला आहे. या बाबत संबंधित पुरवठा ठेकेदारावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी अंगणवाडी सेविका सर्व ग्रामस्थांनी केली आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच जावली तालुका उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, जावली तालुका सभापती जयश्रीताई गिरी, उपसभापती सौरभ शिंदे, प्रकल्प अधिकारी गटविकास अधिकारी रमेश काळे, महिला बाल विकास अधिकारी कोळेकर, सुपवायझर कदम, बालविकास प्रकल्प अधिकारी सपकाळ घटनास्थळी दाखल झाले. सर्व अंगणवाडीमध्ये पुरवल्या गेलेल्या अन्नधान्याची तपासणी करण्यात आली. यासाठी जिल्हा स्तरावर लॅबमध्ये याची तपासणी केल्यानंतर अहवाल सादर केला जाईल असे गटविकास अधिकारी खूप काळे यांनी सांगितले. पुरवठा करणाऱया ठेकेदाराचे नाव अद्यापही समोर न आल्याने उपस्थित ग्रामस्थ आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला. अखेर हा पुरवठा करणारा नेमका ठेकेदार कोण ? याबाबत लवकरात लवकर त्याचे पितळ उघडे करावे, अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली. या विभागातील 11 अंगणवाडय़ांना अशाच पद्धतीचा पुरवठा करण्यात आला असून जिह्यात देखील या ब्रँडचे पुरवठा करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
या पुरवल्या गेलेल्या अन्नधान्यामध्ये निकृष्ट दर्जाचे फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ, डाळ, मीठ, मिरची पूड त्याचबरोबर इतर साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे ग्रामस्थांना दिसून आले. दोन दिवसांपूर्वीच इंदिरानगर वस्तीतील एका कुटुंबातील मुलाने तांदूळ व डाळ खाल्ल्याने त्याला बाधा झाली. या घटनेने संबंधित अंगणवाडी सेविका व पुरवठा प्रकल्प अधिकाऱयांना याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही याबाबत ठोस उपाययोजना न झाल्याने हा प्रकार अंगणवाडी सेविकांनी माजी उपसरपंच वीरेंद्र शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिला. लहान मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार संबंधित विभाग व ठेकेदार करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी याबाबत वरिष्ठांनी कठोर पावले उचलत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.