ऑनलाईन टीम / पिंपरी :
पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी येथे स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक 15 वर्षीय मुलगी इमारतीच्या ढिगाऱयाखाली दबली होती. या घटनेची माहिती अग्निशमन विभाग व भोसरी पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर तात्काळ घटनास्थळी दाखल होत अग्नीशमन दलाच्या जवानांना या मुलीला तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात यांना यश मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. ढिगाऱयाखाली अडकलेल्या मुलीचे नाव पौर्णिमा मडके असे आहे. मडके कुटुंब राहात असलेली देवकर ही इमारत मोडकळीस आली होती. आज सकाळच्या सुमारास मडके कुटुंब राहात असलेल्या पहिल्या मजल्यावर अचानक माती पडायला लागली. हे पाहून आई आणि लहानी मुलगी घराबाहेर पडल्या. तर, वडील हे कामानिमित्त बाहेरच होते. मात्र, मोठी मुलगी पौर्णिमा ही बाथरूममध्ये असल्याने ती त्याच ठिकाणी अडकली आणि इमारत हळूहळू ढासळू लागली आणि पौर्णिमा ढिगाऱयाखाली अडकली.
दरम्यान, तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पौर्णिमा हिला सुखरूप बाहेर काढण्यात आले. यामध्ये पौर्णिमा जखमी झाली असून तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.