महिलावर्गासाठी कपडय़ांसोबतच ऍक्सेसरीजही खूप गरजेच्या असतात. ऍक्सेसरीजच्या रास्त निवडीमुळे तुमचं व्यक्तिमत्त्व उठून दिसतं. सध्या बेल्टचा ट्रेड आहे. हे बेल्ट खूपच आकर्षक दिसतात. आता तर साडय़ांवरही बेल्ट लावले जातात. बेल्टची निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात याविषयी…
बेल्टचे वेगवेगळे प्रकार पहायला मिळतात. त्यात फॉर्मल ड्रेस बेल्ट, सेमी फॉर्मल बेल्ट, कॅज्युअल बेल्ट यांचा समावेश होतो. फॉर्मल ड्रेस बेल्ट घेताना मटेरियलकडे विशेष लक्ष द्या. आपल्या शरीराच्या ठेवणीनुसार बेल्टची निवड करा. शरीराचा वरचा भाग अधिक जाड असेल तर एक्स्ट्रा फ्रिंजेज असणारे बेल्ट विकत घ्या. तसंच बेल्ट असणार्या प्रावरणांची निवड करा. शरीराचा खालचा भाग अधिक स्थूल असेल तर एक किंवा दोन इंच रुंदीचे मेटालिक थीन बेल्ट शोभून दिसतील. सॅटिनचा डबल नॉट बेल्टही शोभून दिसेल. बुटक्या महिलांनी नक्षीकाम केलेला किंवा जाड बेल्ट वापरू नये. प्रावरणाच्या रंगाशी मेळ खाणारा बारीक पट्टा शोभून दिसेल.
फॉर्मल ट्राउझरवर मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट रंगाचा लेदर बेल्ट घ्या. जीन्सवर मेटल बक्कलवाला कॉटनचा बेल्ट चांगला दिसेल. जंपसूटवर जाड लेदर बेल्ट किंवा सॅटिन बेल्ट शोभून दिसेल. प्रावरणांच्या रंगाला साजेसे बेल्ट निवडा. बेल्टला शोभणारी पादत्राणं घालता येतील. सध्या बेल्टचा जमाना आहे. त्यामुळे एक चांगलासा बेल्ट नक्की विकत घ्या.