फोंडाघाट / वार्ताहर:
तालुक्यामध्ये राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या बनवलेल्या फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणूकिमध्ये भाजपा प्रणित संस्था विकास पॅनल वर महाविकास आघाडी प्रणित संकल्प पॅनलने मात करत फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीवर वर्चस्व स्थापन केले फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे ही निवडणूक दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची बनविली होती. निवडणूक तारीख ठरविण्यावरून निवडणुकीपूर्वी दोन्ही गटांमध्ये मोठी ओढाताण झाली होती. सत्ताधारी पॅनल कडून आपण बांधलेल्या नवीन इमारतीचा आणि पुढील कामांचा या निवडणूक प्रचारामध्ये वापर करण्यात आला होता तर विरोधक असलेल्या संकल्प पॅनल कडून सत्ताधारी संचालकांकडून ही इमारत बांधताना, शिक्षक भरती करताना झालेल्या भ्रष्टाचाराचा या निवडणूक प्रचारादरम्यान मोठा वापर करण्यात आला होता. दरम्यान काल उशिरा रात्री पर्यंत झालेल्या मतमोजणी मध्ये महाविकास आघाडी प्रणित संकल्प पॅनलचे १० संचालक निवडून आले तर भाजपा प्रणित संस्था विकास पॅनलचे ५ संचालक निवडून आले. महाविकासआघाडी प्रणित संकल्प पॅनल कडून निवडून आलेल्या मध्ये संजय आंग्रे ५४१ मते, संदेश सावंत ४८८, आनंद मर्ये ४५८, सुभाष सावंत ४३३, दत्तात्रय पवार ४२३, रंजन नेरुरकर ४११, विठोबा तायशेट्ये ३९८, महेश सावंत ३९४, चंद्रशेखर लिंग्रस ३६७ आणि रमेश भोगटे ३६१ भाजपच्या संस्था विकास पॅनलचे राजन चिके 487, सदानंद हळदीवे 416, मनिष गांधी 414, अभिनंदन डोर्ले 380, श्रीकांत आपटे 367 हे उमेदवार विजयी झाले असून या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये अरुण म्हसकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून उत्तम कामगिरी बजावली. महाविकास आघाडी प्रणित संकल्प पॅनलच्या नूतन संचालकांचे शिवसेना नेते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत आणि युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

