बोरी, शिरोडा, बेतकी व उसगावात कमळ फुलले
प्रतिनिधी/ फोंडा
जिल्हा पंचायत निवडणुकीत फोंडा तालुक्यातील 7 मतदारसंघामध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत भाजपाने 7 पैकी 4 तर मगो पक्षाने 6 पैकी 3 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेस व आम आदमी पक्षाने प्रत्येकी 2 जागा लढविल्या होत्या. त्यांना एकाही ठिकाणी आपले खाते उघडता आले नाही. कुर्टी, वेलिंग प्रियोळ व कवळे या तीन जागांवर मगो पक्षाने मोठय़ा मताधिक्क्याने विजय मिळविला. तर बोरी, शिरोडा, बेतकी खांडोळा व उसगांव या चार जागांवर भाजपाने बाजी मारली. 11 पैकी एकाही अपक्ष उमेदवाराला विजय संपादन करता आला नाही.
बोरी मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार व विद्यमान जिल्हा पंचायत सदस्य दीपक नाईक बोरकर हे सलग दुसऱयांदा विजयी झाले आहेत. भाजपाशी बंडखोरी करून स्वतंत्र उमेदवारी करीत भाजपासमोर आव्हान उभे केलेल्या पूनम चंद्रकांत सामंत यांना 496 मतांनी पराभव पत्करावा लागला. दीपक बोरकर यांना 2459 तर पूनम सामंत यांना 1963 मते मिळाली. तिसऱया स्थानावर आलेल्या मगोच्या बाबुराव सालेलकर यांना 1646 मते मिळाली. आपसह एकूण 7 उमेदवार बोरीतून रिंगणात होते.
पक्ष पातळीवर झालेल्या या निवडणुकीत कवळे मतदारसंघ राखण्यास पुन्हा एकदा मगोला यश आले आहे. आमदार सुदिन ढवळीकर यांचा कायम प्रभाव राहिलेल्या या मतदारसंघातून मगोचे गणपत नाईक यांनी मोठय़ा मताधिक्क्याने विजय संपादन केला. त्यांना 5557 मते तर दुसऱया स्थानावर असलेले त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार सुदेश रत्नाकर भिंगी यांना 2401 मते मिळाली. भाजपाचे जयराज नाईक हे चौथ्या स्थानावर आले असून त्यांना 1147 मते मिळाली आहेत. एकूण पाच उमेदवार या मतदारसंघातून रिंगणात होते.
उसगाव मतदार संघात पुन्हा एकदा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचा प्रभाव दिसून आला. उसगांवातून राणे यांचे समर्थक असलेले भाजपाचे उमाकांत महादेव गावडे यांनी 2088 मताधिक्क्यांनी काँग्रेसचे मुकुंद गावडे यांचा पराभव केला. भाजपा विरुद्ध काँग्रेस अशा या थेट लढतीत उमाकांत गावडे यांनी 4534 तर मुकुंद गावडे यांनी 2446 अशी मते मिळविली.
कुर्टी मतदारसंघ सलग दुसऱयांदा राखण्यास मगो पक्षाने यश मिळविले आहे. मगो रायझिंग फोंडाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांच्या नेतृत्त्वाखाली मगोच्या प्रिया बाबू च्यारी यांनी ही जागा जिंकली. प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाच्या संजना सुदेश नाईक यांचा 755 मतांनी पराभव केला. प्रिया च्यारी यांना 4452 तर संजना नाईक यांना 3697 व काँग्रेसच्या प्राची नाईक यांना 1808 मते मिळाली. मगो, भाजपा व काँग्रेस अशा तिरंगी लढतीमध्ये मगो रायझिंग फोंडाने कुर्टीवर झेंडा फडकाविला आहे.
शिरोडा मतदारसंघात भाजपाचे नारायण नंदा कामत यांनी 1567 अशा मोठय़ा मताधिक्क्याने दणदणीत विजय संपादन केला. मगोचे मान्युएल क्रूझ यांचा त्यांनी 1567 मतांनी पराभव केला असून नारायण यांना 4099 तर मगोचे मान्युएल यांना 2532 मते मिळाली. आपचे रिचर्डसन कुलासो यांना 1354 मते मिळाली असून अपक्षासह एकूण 4 उमेदवार याठिकाणी रिंगणात होते.
बेतकी खांडोळा मतदारसंघात भाजपाचे श्रमेश सुकडू भोसले यांनी मगोचे विश्वजीत पिपी नाईक यांचा 276 मतांनी पराभव केला. श्रमेश यांना 4768 तर विश्वजीत यांना 4492 मते मिळाली. एकूण तीन उमेदवार या ठिकाणी रिंगणात होते. प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांचा पाठिंबा असलेली ही जागा भापाने मगोकडून हिसकावून घेतली.
वेलिंग प्रियोळ मतदारसंघात मगोचे दामोदर नाईक यांनी 2404 अशा मोठय़ा मतांच्या फरकाने भाजपाचे शिवराम गणेश नाईक यांचा पराभव केला. मगो व भाजपासह दोन अपक्ष मिळून एकूण 4 उमेदवार या ठिकाणी रिंगणात होते. दामोदर यांना 5614 तर शिवराम यांना 3210 मते मिळाली. मगोने पुन्हा एकदा या जागेवर वर्चस्व राखले आहे.
उसगावांवर विश्वजित राणेंचे वर्चस्व कायम
मतदारांनी दाखवलेला विश्वास व भाजपा सरकारतर्फे सुरु असलेला विकास या जोरावरच हा विजय मिळविण्यास आम्ही यशस्वी ठरल्याची प्रतिक्रिया मंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केली आहे. भाजपा सरकारच्या विरोधात कितीही अपप्रचार सुरु असला तरी जनता आमच्या पाठिशी आहे, हे या विजयातून सिद्ध झाले आहे, असे ते म्हणाले. यापूर्वी 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत विश्वजीत राणे हे काँग्रेसमध्ये असतानाही उसगांवची जागा जिंकली होती. पुन्हा एकदा त्यांनी आपला प्रभाव राखला आहे.
कुर्टीत मगो रायझिंग
कुर्टी मतदारसंघातील विजयामुळे पुन्हा एकदा फोंडय़ात मगोचा प्रभाव असल्याचे सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया या विजयाचे शिल्पकार असलेले मगो रायझिंग फोंडाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी व्यक्त केली आहे. यापूर्वी 2017 मध्ये झालेल्या फोंडा पालिकेच्या निवडणुकीत रायझिंग फोंडाने 15 पैकी 7 जागा जिंकल्या होत्या. या विजयामुळे डॉ. भाटीकर यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्या उमेदवारीचा दावा अधिक बळकट केला आहे.
शिरोडा, बोरी भाजपाच्या खिशात
शिरोडा मतदारसंघात खरी अटीतटीची लढत मगो भाजपामध्ये होती. दीड वर्षांपूर्वी झालेल्या शिरोडय़ातील विधानसभा पोटनिवडणुकीत मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना भाजपवासी झालेले आमदार सुभाष शिरोडकर यांच्याकडून अवघ्या 70 मतांनी पराभव पत्कारावा लागला होता. या निवडणुकांनंतर शिरोडय़ात मगो हा भाजपाचा प्रमुख प्रतिस्पर्धी बनला आहे. मात्र भाजपाने बोरी व शिरोडय़ातील दोन्ही जागा जिंकून पुन्हा एकदा आपले वर्चस्व दाखविले आहे.
बेतकी-खांडोळा जिंकले, प्रियोळ निसटले
प्रियोळ मतदारसंघातील बेतकी खांडोळय़ातील जागा भाजपाने स्थानिक आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांच्या पाठिंब्यावर राखली असून वेलिंग प्रियोळची जागा मात्र त्यांच्या हातून निसटली आहे. बेतकी खांडोळाचे उमेदवार श्रमेश भोसले यांना शुभेच्छा देताना कमी मतांनी ही जागा जिंकली तरी, ‘ज्यो जीता, वही सिकंदर’ अशी प्रतिक्रिया गोविंद गावडे यांनी व्यक्त केली.
मडकई मतदारसंघ हा मगोचा बालेकिल्ला असून कवळे मतदारसंघातील विजयामुळे मगोचा व आमदार सुदिन ढवळीकर यांचा प्रभाव या विजयातून अबाधीत राहिल्याचे युवा नेते मिथिल ढवळीकर यांनी सांगितले.