प्रतिनिधी / फोंडा
फोंडा पालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी बुधवारी दुपारी पदाचा अधिकृत ताबा घेतला. तत्पूर्वी सकाळी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्यांच्या साखळी येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. स्वपक्षामध्येच बंड करुन भाजपाचे अधिकृत उमेदवार रितेश रवी नाईक यांचा पराभव केल्याने कोलवेकर हे सध्या चर्चेत आहेत.
मुख्यमंत्र्यांशी भेटी दरम्यान फोंडा पालिकेच्या विकासासाठी सरकारकडून सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना शुभच्छा देताना नगराध्यक्ष म्हणून फोंडा शहराच्या विकासासाठी कार्यरत राहण्याचा सल्ला दिला. जरी फोंडा भाजपा मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेतलेली असली तरी भाजपाचा कार्यकर्ता म्हणून त्यांनी पक्षासाठी सतत कार्यरत राहावे असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितल्याची माहिती कोलवेकर यांनी दिली. दरम्यान मंगळवारी झालेल्या नगराध्यक्षपदी निवड प्रक्रियेच्यावेळी झालेल्या गुप्त मतदानाच्यावेळी दोन्ही गटातून दोघा नगरसेवकांकडून परस्पर विरोधी क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा पालिकेच्या अंतर्गत गोटातून सुरु आहे. फोंडा पालिका मंडळामध्ये काही अंतर्गत घडामोडींनाही वेग आल्याची माहिती अंतर्गत सुत्रांकडून मिळाली आहे.