प्रतिनिधी/ फोंडा
कांदा दरवाढीचा निषेध म्हणून मडगाव व पणजीनंतर महिला प्रदेश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी फोंडा शहरात 25 रुपये प्रतिकिलो दराने स्वस्तात कांद्याची विक्री केली. ग्राहकांनी अवघ्या काही वेळात झुंबड करून स्वस्त दरातील हे कांदे खरेदी केले.
कांद्याचे दर गगनाला भिडलेले असताना भाजपा सरकार जनतेला स्वस्त दरात कांदा देण्यास पूर्णपणे अपयशी ठरले असून मुख्यमंत्र्यांची रेशनकार्डावरील तीन किलो कांद्यांची घोषणाही हवेत विरल्याचा आरोप महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो यांनी केला. कांदा ही गोमंतकीयांच्या दैनंदिन आहारातील गरज असून 80 ते 100 रुपये किलो दरातील कांदा सर्वसामान्य जनतेला परवडणारा नाही. हे दर कमी करण्यापेक्षा कांद्याविना जेवण कसे रुचकर बनते हे जाहीररित्या सांगणाऱया भाजपा महिला मोर्चाचा त्यांनी निषेध केला. राज्यात केवळ साडेतीन लाख कुटुंबीयांकडे रेशनकार्ड असून उर्वरित लोकांचे काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यातील भाजपा सरकारला जनतेची काळजी असल्यास त्यांनी सवलतीच्या दरात रु. 25 ते 30 किलो दराने कांदा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. कोरोना महामारीमुळे अनेकांना नोकऱया गमवाव्या लागल्या असून क्यावसाय धंदेही अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत वाढत्या महागाईत जगणे अवघड झालेले असताना सरकारकडून जनतेला कुठलाच दिलासा मिळत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी कांद्याच्या भाववाढीवरून सरकार विरोधात घोषणा देण्यात आल्या.