बंकबेड विविध शैलीत मिळतात. असंख्य प्रकार, डिझाइन, रंगसंगती, साहित्याचे बंकबेड बाजारात मिळतात. मटेरियलचा विचार केल्यास लाकूड, धातू किंवा दोन्हीचा मिश्र वापर असलेला बंकबेड मिळू शकतो. ट्रडिशनल शैलीचे घ्यायचे झाल्यास गडद रंगाचे बंकबेड घेता येतील.
मुलांसाठी वेगळी स्वतंत्र खोली हवीच हवी, अशी काहीशी परिस्थिती सध्या दिसते आहे. सध्याच्या इमारत बांधकामात या खोलीनेही स्वतंत्र अस्तित्व मिळवलं आहे. त्यामुळे या खोलीसाठी जागा ठेवणं आजच्या घडीला आवश्यक झालं आहे. मुलांसाठी खोली रचली की त्यांच्यासाठी बंकबेड हा आलाच. इतर फर्निचर खरेदी करणं फारसं कठीण नसतं पण बंकबेडच्या खरेदीत दुर्लक्ष करून चालत नाही. यात कोणतीही कसूर चालत नाही. बंकबेड घेताना सुरक्षितता महत्त्वाची असते. बंकबेड घेण्याआधी पुढील काही मुद्देही विचारात घेतले गेले पाहिजेत.
जागेचे मोजमाप- आपण जो बंकबेड घेणार आहोत तो आपल्या मुलांच्या खोलीत मावतो का हे जाणून घ्यावे. बंकबेडचा आकार लक्षात घेऊन आपल्या खोलीचे मोजमापही पाहावे लागते. जमिनीवरील उपलब्ध जागा (एका भिंतीपासून दुसऱया भिंतीपर्यंतचे मोजमाप), सीलिंगपर्यंतची उंची माहित करून घ्यायला हवी. सीलिंग आणि बंकबेड यांच्यात किमान 2 फूट इतकी मोकळी जागा असावी. बंकबेड अगदीच छताला टेकेल असे असू नये. बंकबेडची उंची सर्वसाधारणपणे पाहता साडेपाच ते 6 फूट इतकी असते. जमिनीवरील उपलब्ध जागा पाहून त्याप्रमाणे आजुबाजूला मोकळी जागा राहिल असा बंकबेड कधीही चांगला. बंकबेडच्या आसपास फर्निचरची गर्दी करता कामा नये. या दोन फर्निचरमधलं अंतरही तसं खूप हवं.
दोन पलंगाचे आणि एका पलंगाचे बंकबेड असे पर्याय बाजारात मिळतात. शिवाय आता तर यातही मॉडर्न बंकबेड आले आहेत. यासाठी अधिक जागा लागते ती अलग. साठवणुकीसाठी आवश्यक ड्रॉव्हर्ससहचेही बंकबेड येतात. एल आकाराचे बंकबेडही येतात. आपल्या खोलीच्या आकारमानाप्रमाणे हे बंकबेड घेता येतील.

निवड महत्त्वाची- आपल्याला किती मुलांसाठी बंकबेड घ्यायचा आहे हे आधी ठरलं पाहिजे. एकावर एक गादीची सोय असलेला बंकबेड बाजारात मिळतो. तर दोन गाद्यांची सोय असलेलं बंकबेडही मिळतं. आपल्या गरजा पाहून त्याप्रमाणे बंकबेड घेता येईल. बेसीक आणि लॉफ्टेड अशा प्रकारात बंकबेड घेता येतील. एकावर एक गाद्या किंवा अभ्यासाच्या टेबलावर गाद्यांची सोय असलेलं बंकबेडही येतं. तिघांना झोपण्याची सोय होईल असं बंकबेडही येतं.
गरजांप्रमाणे बंकबेडची खरेदी- अभ्यासाचे टेबल किंवा विभाग, साठवणुकीचे कप्पे, घसरगुंडी किंवा तंबू असे खेळ अशा सोयींच्या गरजेसहचेही बंकबेड घेता येतात. मुलाचे वय आणि गरजा लक्षात घेऊन इतर सोयी करून घेता येतात. पुलआऊट बंकबेड मिळतं. यात एकात एक बसवलेले पलंग (ड्रॉव्हरपद्धतीचे)असतात.
शैलीही महत्त्वाची- बंकबेड विविध शैलीत मिळतात. असंख्य प्रकार, डिझाइन, रंगसंगती, साहित्याचे बंकबेड बाजारात मिळतात. मटेरियलचा विचार केल्यास लाकूड, धातू किंवा दोन्हीचा मिश्र वापर असलेला बंकबेड मिळू शकतो. ट्रडिशनल शैलीचे घ्यायचे झाल्यास गडद रंगाचे बंकबेड घेता येतील शिवाय आधुनिक स्वरूपाचे घेताना बारीक रेषांचा वापर केलेले बंकबेड घेण्याचा पर्याय आपल्यासमोर राहतो. आपल्या घराच्या एकंदर सजावटीतील थीमचा विचार येथे करायला हवा.
सुरक्षितता- बंकबेड नुसतेच साधा पलंग असतो तसे असता कामा नये. लहान मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करून बंकबेडला दोन्ही बाजूला आधारासाठी फळय़ा असाव्यात. शिवाय हेडबोर्डही महत्त्वाचा असतो. बंकबेडची बांधणीही मुलांच्यादृष्टीने सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यायला हवी.