पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ व पुदुच्चेरी अशा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार सध्या टीपेला पोहोचला आहे. तरीदेखील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, पक्षांतरनाटय़, कुरघोडय़ा, राजकीय शह-काटशह नि क्षणाक्षणाला बदलणारी समीकरणे पाहता वंगभूमीतील सामना अटीतटीचा वा रंगतदार होणार, हे निश्चित. एकेकाळी बंगाल हा डाव्यांचा गड म्हणून ओळखला जात असे. तब्बल 34 वर्षे अभेद्य असलेल्या डाव्यांच्या या किल्ल्याला ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने ‘माँ, माटी, माणूश’चा नारा देत 2011 मध्ये भगदाड पाडले. मागची दहा वर्षे या राज्यात आपला प्रभाव निर्माण करणाऱया ममतादीदींपुढे आता भाजपाने महाकाय आव्हान उभे केले आहे. तृणमूलमधील एकापेक्षा एक दिग्गज नेत्यांना फोडून तृणमूलचा शक्तिपात करण्यासोबतच दीदींना एकटे पाडण्याचा भाजपाने रचलेला हा डाव किती यशस्वी होतो, हे लवकरच कळेल. किंबहुना, सध्याची प्रचाराची पातळी व त्यातील मुद्दे बघता ही निवडणूक अभूतपूर्वच म्हणायला हवी. निवडणूकपूर्व सर्वेक्षणानुसार, या निवडणुकीत निसटता विजय मिळवून तृणमूलचीच सत्ता येईल, असे भाकित वर्तविण्यात आले आहे. या कलचाचणीत ममता यांनाच पसंती देण्यात आली असून, त्यांच्या पक्षाला 156 ते 158 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली दिसते. अखेरीस या सगळय़ा शक्याशक्यता आहेत. तरीदेखील तृणमूलचे पारडे काही प्रमाणात का होईना जडच म्हणावे लागेल. तशी भाजपाने मधल्या टप्प्यात जोरदार मुसंडी मारली होती. परंतु, ममता बॅनर्जी यांच्या पायाला झालेली दुखापत, त्यातून त्यांच्याबद्दल निर्माण झालेली सहानुभूती व अति पक्षांतरामुळे भाजपात निर्माण होत असलेला असंतोष या बाबी तृणमूलसाठी साहय़भूत ठरतील, असे मानायला जागा आहे. प्रचारादरम्यान ममतादीदींना झालेली दुखापत हा नियोजनबद्ध हल्ला होता, असे तृणमूलचे म्हणणे आहे. आपला जीव घेण्याचा हा कट असल्याचा दावा ममतादीदींनीच केला आहे. व्हील चेअरवरून मैदानात उतरलेल्या या जखमी वाघिणीने ‘मला रोखणे शक्य नाही. भाजपाविरोधातील संघर्ष आपण श्वास असेपर्यंत सुरूच ठेवू’ अशी डरकाळी फोडत आणखी आक्रमक पवित्रा घेण्याचेच संकेत दिले आहेत. दुसरीकडे तृणमूल सत्तेत असताना 130 भाजपा नेते किंवा कार्यकर्त्यांची तृणमूलच्या गुंडांनी हत्या केली असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदनांचे काय, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. या दोघांमधील हे वाप्युद्ध पुढच्या टप्प्यात अधिक भडकत जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे निवडणूक प्रचारातील हुकमी एक्का. त्यांचे वक्तृत्व, टायमिंग वा नवा मुद्दा पेरून निकालाला कलाटणी देण्याची हातोटी विलक्षण आहे. या मोदीत्वाच्या बळावरच अनेक निवडणुका भाजपाने जिंकलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचारसभांकडे बारकाईने लक्ष द्यावे लागेल. खरा सामना मोदींशी आहे, हे दीदींनाही ठाऊक असणार. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातील धारदार आक्रमणांना ही घायाळ वाघीण कशी पुरून उरते, हे पाहणे औत्सुक्याचे असेल. पूर्वी डावे व तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये हाणामाऱया होत. आता तृणमूल व भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झडतो आहे. दोन पक्षांमधील सत्तेच्या मारामारीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा बळी जाणे, खरोखरच वेदनादायक आहे. प्रत्येक पक्षाला विस्ताराचा अधिकार आहे. आपलीच सत्ता यावी, असे वाटणेही स्वाभाविकच. त्यासाठी आवश्यक राजकारण, नवनवीन क्लृप्त्या, प्रचारपद्धती जरुर वापरल्या जाव्यात. परंतु, हिंसेपासून दूर रहायला हवे. तृणमूल, भाजपसह सर्वच पक्षांनी हे पथ्य पाळावे. तसा पक्षांतर हा बंगालच्या निवडणुकीतील एक विक्रम मानावा लागेल. कुणी कुठल्या पक्षात जावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु, कोणत्याही वैचारिक अधिष्ठानाशिवाय उसळलेल्या पक्षांतराच्या लाटा किती शाश्वत असतील, हा प्रश्नच असतो. त्यात पक्षातील जुन्या जाणत्यांना डावलूनच आयारामांची खोगीरभरती करण्यात येत असेल, तर त्यांची नाराजाही स्वाभाविकच म्हणता येईल. बंगालमध्ये आज हेच चित्र दिसून येते. केंद्रीय नेतृत्वाने एखाद्या पॅराशूटप्रमाणे काहींना उमेदवारी दिली असून, त्यामुळे पक्षाचे नुकसान होऊ शकते, अशी भीती हे निष्ठावान कार्यकर्ते उपस्थित करतात. इतकेच नव्हे या विरोधातील त्यांचा आंदोलनात्मक पवित्रा पक्षाकरिता तापदायकच ठरू शकतो. भाजपाने महाराष्ट्रातही हाच प्रयोग केला होता. निष्ठावानांना डावलून कमळ फुलविण्याची ही नीती आजघडीला फायदेशीर असली, तरी त्याबाबत तारतम्य न बाळगल्यास त्यापासून धोकेच संभवतात, हे पक्षनेतृत्वाने ध्यानी घ्यावे. एकीकडे दीदींच्या निकटवर्तीय अभिनेत्या व तृणमूलच्या दोन वेळच्या आमदार देवश्री रॉय यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेशाचे संकेत दिले आहेत. असे बिनीचे शिलेदार गमावणे, ममतांनाही मारक ठरू शकते, तर दुसऱया बाजूला भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा हे तृणमूलमध्ये दाखल झाले असून, त्यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा व रणनीतीचा पक्षाला किती फायदा होणार, हे पहावे लागेल. याशिवाय क्रिकेटपटू मनोज तिवारी व आणखी काही मंडळींनीही तृणमूलशी घरोबा केला आहे. त्यामुळे सामना उत्तरोत्तर रंगत जाणार, हे निश्चित. बंगालला राजा राममोहन राय, स्वामी विवेकानंद, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासह अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांचा वारसा आहे. प्रागतिक विचारांमध्ये कायम आघाडीवर असलेल्या बंगालमध्ये काय होते, हे महत्त्वाचे असेल. खरे तर अशा राज्यामधील निवडणुकीचे मुद्दे तरी प्रगल्भ वा लोकांच्या जीवन-मरणाशी संबंधित असायला हवेत. तथापि, विकासाचा मुद्दा येथेही धूसर झालेला पहायला मिळतो, हे दुर्दैवच. 2024 च्या लोकसभा निवडणुकाच्या दृष्टीने बंगालसह पाच राज्यातील निवडणूक ही रंगीत तालीमच आहे. म्हणूनच हे रणांगण कोण गाजवतो, याकडे देशाचे लक्ष असेल.
Previous Articleटाटा पॉवरबरोबर टेस्लाचा करार शक्य
Next Article महिंद्राला रिझर्व्ह बँकेची मंजुरी
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.
Related Posts
Add A Comment