वॅलेंटाईन डे स्पेशल
प्रेम ही वैश्विक भावना आहे. त्यामुळे प्रेम म्हणजे ‘तो किंवा ती’ असाच विचार करणे योग्य नाही. आपण देशावर प्रेम करतो, परस्परांवर प्रेम करतो, तशीच काही माणसे समाजावर नितांत प्रेम करतात आणि त्या प्रेमापोटी निरंतर कार्यरत राहतात. आजच्या घडीला असे ‘समाजप्रेम’ वाढण्याची नितांत गरज आहे. कोणी समाज प्रेमापोटी देव-देवतांच्या भग्न प्रतिमा संकलित करते, कोणी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी साहाय्य करते, कोणी रक्तदान करून निराधारांसाठी धावून जाते तर कोणी दिव्यांगांना लघु उद्योजक म्हणून उभे करू पाहते. अशा आदर्शांची आज समाजाला गरज आहे. याच अनुषंगाने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने एक वेगळा विचार मांडण्याचा हा प्रयत्न…
जेथे जीव तेथे शिव : वीरेश हिरेमठ

देवदेवतांच्या प्रतिमांचा अनादर होऊ नये म्हणून त्यांच्या भग्न प्रतिमा संकलित करणारे वीरेश हिरेमठ यांचा जीवनप्रवास वेगळा आहे. राजहंसगड येथे त्यांचा जन्म झाला. गरिबीमुळे गवंडी काम केले. ट्रकवर हमाली करणेही स्वीकारले. कारण ट्रकमधून प्रवास करताना अभ्यास करता येत होता. परिस्थितीशी लढत एम. ए. ची पदवी घेतली. ‘इरय्या’ नावावरून ते स्वामी आहेत. म्हणून नोकरी मिळताना अडचणी आल्या. त्यामुळे इरय्या यांनी आपले नाव वीरेश करून घेतले.
नोकरीची गरज होती आणि विजया हॉस्पिटलमधून संधी मिळाली. येथे रिसेप्शनिस्टपासून अनेक पदभार त्यांनी सांभाळला आणि उत्तम काम करत आज प्रशासक म्हणून ते काम करत आहेत. मात्र, हे काम करताना भग्न प्रतिमा संकलन करण्याची गरज का वाटली? या प्रश्नावर ते म्हणतात, ‘लहानपणी मी म्हशी चारायला नेत असे. तेव्हा गावच्या वेशीमध्ये देवदेवता आणि राष्ट्रपुरुषांच्या भग्न प्रतिमा, चित्रे आढळत. त्याचे संकलन करून मी काही बुकमार्क करत असे. तर पत्रिका दुमडून त्याची पिपाणी तयार करत होतो. गेल्या काही वर्षांत बहुसंख्य झाडांखाली भग्न प्रतिमा आढळल्याने त्यांचे संकलन मी सुरू केले. ‘तरुण भारत’ने त्याची दखल घेतल्याने लोकांना माहिती मिळाली. गेल्या दोन-चार वर्षात इतक्मया भग्न प्रतिमांचे संकलन केले की चार ट्रक इतक्मया प्रतिमा जमा झाल्या. एक ट्रक भरला की आपण त्याचे विसर्जन करतो. काच असल्यास बाजूला काढतो आणि कागद, फोटो होम करून त्यात घालतो. ही राख नदीकिनारी नेऊन खड्डा खणून त्यात घालून तेथे बेलाचे रोप लावतो. आजपर्यंत एक हजार रोपे लावली आहेत.’
हे करतानाच रस्त्यावर, महामार्गावर किंवा कोणत्याही रस्त्यावर कुत्र्यासह एखादा प्राणी झोपला असेल तर वाहनांनी त्याला ठोकरू नये, यासाठी वीरेश त्याला उचलून कडेला ठेवतात. दुर्दैवाने अशा वाहनांमध्ये एखादा प्राणी दगावला तर स्वतः त्याच्यावर अंत्यसंस्कार करतात. आज वीरेश यांच्या कामाशी अनेक हात जोडले आहेत. सुभाष पाटील यांनी त्यांना संकलित प्रतिमा ठेवण्यासाठी जागा करून दिली आहे. वीरेश म्हणतात, ‘जेथे जीव आहे तेथे शिव आहे.’ त्यामुळे वाहनधारकांनी वाहन चालवताना कोणत्याही वाहनामुळे प्राणी दगावणार नाही, याची काळजी घ्यावी, असे ते सांगतात.
कोणत्याही मृत प्राण्यावरून वाहन गेल्यास त्यातून बॅक्टेरिया निर्माण होऊन पर्यावरणाला धोका होतोच, परंतु माणसांना पण त्वचारोग उद्भवू शकतात, हे लक्षात घेण्याचे आवाहनही ते करतात.
‘माझा वाटा खारीचा’: गीता शंकर पवार

जेथे शिक्षक विद्यार्थ्यांना मुलांसमान वागवतात, तेथे मुलेसुद्धा मेहनत घेऊन शिक्षकांचे नाव उज्ज्वल करतात. शाळेत येणाऱया प्रत्येक विद्यार्थ्याची परिस्थिती वेगवेगळी असू शकते. त्यातही सरकारी शाळेत येणारी बहुसंख्य मुले ही वंचित घटकातीलच असतात. त्यांच्या पोटार्थी पालकांना मुलांकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही, हे लक्षात घेऊन त्यांच्या प्रगतीसाठी झटताना आपले पैसे खर्च करणाऱया मुख्याध्यापिका म्हणजे गीता शंकर पवार.
बेळगावच्याच असलेल्या गीता यांनी टीसीएचनंतर 1995 मध्ये वाघवडे शाळेमध्ये काम केले. त्यानंतर आनंदवाडी शाळा नं. 24 येथे चौदा वर्षे काम करून सध्या त्या सराफ गल्ली येथील 13 नंबर शाळेत कार्यरत आहेत. आपल्या विद्यार्थ्यांसाठी सढळ हस्ते पैसा खर्च करणाऱया गीता यांना बोलते केले, तेव्हा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, हीच भावना त्यांच्या बोलण्यातून जाणवली.
त्या म्हणतात, सरकारी शाळांमध्ये पटसंख्या कमी झाली आहे. पूर्वी कुटुंबांमध्ये तीन-चार मुले असत. विभक्त कुटुंबामुळे मुलांची संख्या कमी झाली आणि शाळांमधून संख्याही रोडावली. सरकारी शाळेमध्ये येणाऱया बहुसंख्य मुलांचे पालक हे कामगारवर्गातील असून मोलमजुरी करतात. अनेकदा वडील व्यसनाधीन असल्याने आई मोलमजुरी करून मुलांना शिकविण्यासाठी धडपड करते, हे दिसून आले.
याच कारणास्तव आपण मुलांना मदत करत आहोत. सरकार गणवेश, वहय़ा व बूट देते. परंतु, त्यांच्यासाठी दफ्तर, वहय़ापुस्तके, स्वेटर, इतर शैक्षणिक साहित्य हे सर्व आपण आपल्या खर्चाने देत आहोत. कोणत्याही कारणास्तव मुलाचे शिक्षण अडले तर ती अडचण दूर करणे ही आपली जबाबदारी आहे, असे त्यांना वाटते. सरकारी शाळांमध्येही उत्तम शिक्षण मिळते, असा विश्वास त्यांना आहे. म्हणूनच खासगी शाळांमधील मुलांनासुद्धा त्यांनी या शाळेत आणले आहे.
मराठी शाळा किंवा मातृभाषेतून शिक्षण देणाऱया शाळांचे अस्तित्व टिकले पाहिजे आणि सर्व सुविधांसह सहजसाध्य नव्हे तर टक्केटोणपे खाऊन मुलांनी शिक्षण घ्यायला हवे. त्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव होते, पण अनुभवही मिळतो, अशी गीता यांची धारणा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या या दातृत्वाची कल्पना आहे का? असे विचारता त्या म्हणाल्या, आज माझे विद्यार्थी वेगवेगळय़ा क्षेत्रात नोकरी करत आहेत. लायन्स क्लबने आम्हाला संगणक दिला. परंतु, त्याचे प्रशिक्षण देण्यासाठी आमचा विद्यार्थी धावून आला. यापेक्षा आणखी काय हवे?
शाळेमध्ये मुलांचे वाढदिवस मी करते. कारण त्यांच्या घरी असा समारंभ होणे परिस्थितीमुळे शक्मय नसते. माझ्या पगारातील काही रक्कम मी दरवषी काढून मुलांसाठी खर्च करते. यामध्ये माझे पती शंकर आणि मुलगा, सून, मुलगी व जावई यांचा पाठिंबा आहे. शिवाय शाळेमधील कांबोजी, पाटील, रसूल खान या सर्व शिक्षकवृंदाचे सहकार्य यामुळेच आपण हे करू शकतो. निवृत्तीनंतरही हा परिपाठ मी कायम ठेवणार असल्याचे त्या सांगतात.
ज्याला वाचवतो तो शाप कसा देईल : संतोष दरेकर

फेसबुक प्रेंण्ड्स सर्कल आणि संतोष दरेकर हे समीकरण झाले आहे. कोठेही पक्षी जखमी होवो, झाडावर अडकून पडो, कोणाला तातडीने रक्त हवे असेल किंवा ऑक्सिजन सिलिंडर हवे असेल, रेशन हवे असेल, प्रत्येक गरजू संतोष दरेकरला फोन करतो.
संतोष बेळगावचाच. बी.कॉम. पदवी, याशिवाय काही परकीय भाषांचा त्याचा अभ्यासही आहे. तो स्वतः कॉर्पोरेट टेनर आहे. परंतु, त्याची ही ओळख फारशी माहीत नाही. त्याचे वडील हयात नाहीत. घरच्या टेम्पोचा व्यवसाय करताना एका ट्रक अपघातात त्याचे वडील दगावले आणि त्यांची तुटलेली बोटे घेऊन तो सिव्हिलमध्ये पोहोचला. त्याचवेळी अशा अपघाती व्यक्तींना आपण सतत मदत करायची, हे त्यांनी ठरविले.
व्हॅक्सिन डेपोजवळ एका पक्ष्याला त्याने जीवदान दिले. त्याचे वृत्त ‘तरुण भारत’मध्ये आले आणि संतोषला प्रोत्साहन मिळाले. त्याने गेल्या दहा वर्षांपासून फेसबुक प्रेंड्सच्या माध्यमातून आपले काम सुरू ठेवले. त्याने स्वतः 38 वेळा रक्तदान केले आहे. दहा हजार रक्तदाते, 348 इमर्जन्सी ब्लड डोनर त्याच्या यादीमध्ये आहेत.
आजपर्यंत त्याने अनेक निराधार व गरजूंना मदत केली आहे. तीन हजार जणांचे जीव वाचविण्यासाठी त्याचे प्रयत्न सार्थकी लागले आहेत. 149 कोविड रुग्णांची त्याने सेवा केली असून त्या काळात रुग्णांना ऑक्सिजन सिलिंडरची टंचाई भासणार नाही, यासाठी त्याने प्रयत्नांची शर्थ केली. एका गर्भवतीला 17 युनिट रक्त देऊन तर एका हृदयशस्त्रक्रियेसाठी 15 युनिट रक्त देऊन त्याने त्या रुग्णांना वाचविले आहे. अर्थात त्याला सर्कलच्या सदस्यांची मदत मिळते.
किती प्राणीमात्रांना त्याने जीवदान दिले, याची गणती नाही. कावळा पडला किंवा घुबड जखमी झाले, त्याला तो जीवदान देतो. तेव्हा हे मुके प्राणी शकुनाचे नाहीत, असे त्याला सांगण्यात येते. परंतु, ज्याला आपण जीवदान देतो तो शाप कसा देईल? हा संतोषचा प्रश्न आहे. या कामासाठी संतोष कोणाकडेही आर्थिक मदत मागत नाही. तरीसुद्धा काही जणांनी आपली जबाबदारी म्हणून आर्थिक बाजू उचलली आहे. लोक पैसे देतील, प्राणीपक्षी कुठून देतील, हा त्याचा प्रश्न आहे. कोविड काळात खानापूरच्या दुर्गम गावांमध्ये त्याने धान्य पोहोचविले. इतकेच नव्हे तर जे गाव पूर्णपणे कोविड गाव म्हणून घोषित झाले, तेथेही मदत पोहोचविली. आपले सैनिक देशासाठी आपली सेवा देतात. आपणसुद्धा समाजासाठी किमान एक तास देणे हे आपले कर्तव्य आहे. आपल्यासमवेत किंवा स्वतंत्रपणे प्रत्येक जणांनी सामाजिक बांधिलकी बाळगणे महत्त्वाचे आहे, असे संतोष म्हणतो.
मानव को मानव हो प्यारा : गजानन गव्हाणे

दिव्यांग असल्याने हालचालीविना एक तरुण अंथरुणाला खिळलेला. तीन वर्षे तो एका जागी असल्याने बाहेरचे जग पारखे झालेले. त्याची माहिती मिळताच गजानन गव्हाणे त्याची भेट घेतात, त्याला झोपण्यासाठी कॉट तयार करतात. त्याला कॉटवर झोपवतात आणि त्यांच्या नजरेस पडतात सापाची अनेक पिले… सारेच विलक्षण.
‘डिव्हाईन हेल्पींग हँड्स’ या संस्थेचे प्रमुख असणारे गजानन गव्हाणे यांचा हा अनुभव थरारून सोडणारा. त्याचवेळी या समाजात मदतीची किती जणांना गरज आहे, याची जाणीव करून देणारा. गजानन मूळचे बेळगावचे. परंतु, काकती येथे त्यांचे वास्तव्य आहे. संत निरंकारी मिशनचे ते अनुयायी आहेत. तेथे ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ ही शिकवण दिली जाते. ते स्वतः अनेक वर्षांपासून रक्तदान करणे, काकती येथील हायवे वर अनेकांना मदत करणे असे करतच होते.
कोरोना काळात अनेक ट्रक ड्रायव्हरना उपाशी रहावे लागते, हे लक्षात येताच त्यांनी पुढाकार घेतला. त्याबद्दल आवाहन केले आणि अनेकजण त्यांच्याशी जोडले गेले. प्रत्येकाने आपला वाटा उचलावा आणि मदत करावी, अशा पद्धतीने काम सुरू होते. परंतु, पैशाचा हिशेब देणे भाग असते, त्याचे ऑडिट होते, असे सांगितल्याने संघटना स्थापन झाली. डिव्हाईन हेल्पींग हँड्स म्हणजेच ‘दिव्य मदत’ असे नावही ठरले आणि जोमाने कार्य सुरू झाले.
कोणी निराधार दिसल्यास त्याला बुढापा घरात हलविणे, कोणीही ज्ये÷ एकाकी रहात असल्यास त्यांना महिन्याचे रेशन देणे किंवा ज्याला मदतीची गरज आहे, त्याला मदत पोहोचविणे असे कार्य सुरूच होते. याच दरम्यान बेन्नाळी येथे एक मुलगा तीन वर्षांपासून जमिनीवर झोपून आहे, अशी त्यांना माहिती मिळाली आणि गजानन सहकाऱयांसमवेत तेथे पोहोचले. ‘तुला काय हवे आहे?’ या प्रश्नावर ‘मला चांगले काहीतरी खायला द्या आणि मला फक्त दुसऱया जागेवर ठेवा’ इतकी साधी अपेक्षा त्याने व्यक्त केली. ओल असलेल्या जमिनीवर झोपलेल्या त्या मुलाला पाहून सर्वजण हेलावले.
दुसऱयाच दिवशी त्याच्यासाठी एक जुजबी कॉट, गादी घेऊन ते बेन्नाळीला पोहोचले. त्या मुलाला उचलून गादीवर ठेवताना सर्वांचेच डोळे विस्फारले. कारण त्या जागेत सापाची पिले आढळून आली. चुकून काही दिवस गेले असते आणि सापाने मुलाचा चावा घेतला असता तर? हा विचारही थरकाप उडवणारा. त्या मुलाने माझी आई मोलमजुरीला जाते. तिच्या कमाईवर आपण बसून खात असल्याची खंत व्यक्त केली. तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी फिजिकली हँडीकॅप्ड संस्थेत जाऊन सेकंड हँड तिचाकी खरेदी केली. त्याची दुरुस्ती केली आणि सर्व तऱहेचे कुरकुरे त्यामध्ये ठेवून ती तिचाकी बेन्नाळीला नेली. त्या मुलाला अर्थातच आनंद झाला. पण खरेदी कोण करणार? हा प्रश्न होताच गजानन यांनी गावातील मुलांना स्वतःच पैसे दिले आणि त्याच्याकडून कुरकुरे खरेदी करण्यास सांगितले. इतकेच नव्हे तर गावकऱयांचेही समुपदेशन केले. आज तो मुलगा शाळेसमोर आपल्या तिचाकीवर सर्व साहित्य घेऊन उभा असतो आणि मुलांनी खरेदी केल्यावर त्याच्या चेहऱयावर दिसणारा आनंद ही आपल्या कामाची पोचपावती आहे, असे गजानन यांना वाटते.