चाकणमध्ये 650 कोटींची गुंतवणूक
नवी दिल्ली : देशातील दुचाकी बाजारात आपले वर्चस्व असणारी दिग्गज कंपनी बजाज ऑटो महाराष्ट्रातील चाकण येथे निर्मिती प्रकल्प उभारणार आहे. कंपनी यासाठी 650 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत करारावर (एमओयू) सहय़ा करण्यात आल्या आहेत.
कंपनीने हा निर्णय देशातील उत्पादन वाढविण्यासह निर्यातीत वाढ करण्याच्या उद्देशाने घेतला आहे. 2023 मध्ये या प्रकल्पात कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. सदरच्या प्रकल्पामध्ये केटीएम, हुस्क्वार्ना आणि ट्रायम्फ ब्रँड्सच्या प्रीमियम बाईक्सचे उत्पादन करण्यात येणार आहे. तसेच बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटरचेही उत्पादन याच प्रकल्पातून घेतले जाणार आहे.
बजाजकडे केटीएम-ट्रायम्फची हिस्सेदारी
बजाज ऑटोची केटीएम एजीमध्ये मोठी हिस्सेदारी आहे. कंपनी भारतीय बाजारासाठी 373 सीसी क्षमतेची केटीएम आणि हुस्ववार्ना बाईकचे उत्पादन करत आहे. 2020 मध्ये बजाज ऑटोने युनाइटेड किंग्डमची मोटारसायकल निर्माती कंपनी ट्रायम्फसोबत करार केला आहे.