झटपट तयार होणारी भाजी म्हणून वा जेवण बनवताना पालेभाजी वगैरे नसेल तर बटाट्याची भाजी हमखास बनवली जाते. परंतु या भाजीचे ठरावीक प्रकारच तुम्हाला माहीत असतील. मात्र, दोस्तांनो, तुम्ही बटाट्याची वेगळी रेसिपी म्हणून पोटॅटो पॅनकेक बनवू शकता. झटपट होणारी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल.
साहित्यः एक कप बटाट्याचा कीस, अर्धा कप तांदळाचं पीठ, बारीक चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या, दोन चमचे दाण्याचं कूट, मीठ आणि तेल.
कृतीः सर्वप्रथम बटाटय़ाचा कीस, तांदळाचं पीठ, हिरव्या मिरच्या, दाण्याचं कूट आणि मीठ एका भांडय़ात एकत्र करा, त्यात थोडं पाणी घालून घट्टसर पीठ तयार करा. आता तवा गॅसवर ठेवा. त्यावर थोडं तेल घाला. या पिठाचे गोलाकार पॅनकेक तव्यावर टाका. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. सॉस किंवा चटणीसोबत खा. झटपट होणारी ही रेसिपी रात्रीच्या जेवणासाठी बनवता येईल.