लग्नाच्या तयारीतलं एक मुख्य काम असतं केटरर निवडण्याचं. मेन्यू ठरवताना आपण आपल्या आवडीच्या चवीचा विचार नक्कीच करतो. जे आपल्याला आवडतं ते इतरांनाही खाऊ घालावं हा प्रामाणिक हेतू त्यात असतो. त्याचबरोबर पाहुण्यांना नक्की काय खायला आवडेल, येणारे पाहुणे कोण आहेत, हाही विचार करून नवीन पदार्थांचा मेन्यूमध्ये समावेश केला जातो.
बुफे पद्धतीत अन्न वाया जाऊ नये ही अपेक्षा असते, पण खरंच असं होतं का? यावर विचार करताना जाणवतं की नुसता बुफे मेन्यू आणि ‘लाइव्ह काउंटर’ यात एक मोठा फरक दिसून येतो. बुफेमध्ये सुरुवातीला अंदाज न येऊन सगळं एकत्र ताटात वाढून नंतर काही जेवण ताटात टाकूनही दिलं जातं.
पूर्वीच्या काळी कोशिंबीर, भाजी, वरण-भात, मसाले-भात, पुरी, जिलेबी किंवा श्रीखंड यांनी सजणारं ताट आता वेगवेगळय़ा प्रांतीय, देशीय आणि धर्मीय पदार्थांनी, पक्वान्नांनी सजू लागलंय. ‘ग्लोबलायझेशन’मुळे अनेक पदार्थ घरोघरी वरचेवर केले आणि खाल्ले जाऊ लागले आहेत; शिवाय आवडूही लागले आहेत. नावीन्याची हौस असल्यामुळे असेल पण लग्नसमारंभात पारंपरिकता जपत नावीन्याची कास धरलेली दिसून येते. शिवाय हल्ली लग्न हे जात, भाषा, धर्म, प्रांत, देश या कुठल्याही बंधनात अडकलेलं दिसत नाही. कुटुंबातील सगळेच या बदलाचा खुल्या मनानं स्वीकार करताना दिसतात. आंतरजातीयच नव्हे तर आंतरप्रांतीय, आंतरदेशीय, आंतरधर्मीय विवाह सर्रास होताहेत. मग दोन्हीकडच्या जेवणाच्या पद्धती, पदार्थ स्वाभाविकपणे मेन्यूमध्ये हजेरी लावतात.
हल्ली लग्नाला गेल्यावर पाहुण्यांचं स्वागत ज्यूस अथवा मॉकटेल या ‘वेलकम ड्रिंक’नं होतं. त्याबरोबर व्हेज आणि/किंवा नॉनव्हेज स्टार्टर्स असतात. सॅलड्समध्येही भरपूर विविधता दिसते. पास्ता, रशियन सॅलाड, बुंदी आणि इतरही सजलेल्या सॅलड्सनी आता पूर्वीच्या एकांडय़ा शिलेदार- कोशिंबिरीची जागा घेतली आहे. तर जेवणात चटपटीत खाद्यपदार्थांपासून पारंपरिक खाद्यपदार्थांपर्यंत खाण्याची अगदी रेलचेल असते. डीझर्ट म्हणून नेहमीच्या ओळखीच्या गोड पक्वान्नांबरोबरच इटालियन तिरामिशु, केक, क्रीम केक, चॉकलेट्स, आइसक्रीम्स असतात. त्यातही पान, गुलाबजाम, पुरणपोळी, मोदक, चंदन अशा नव्या पदार्थांसोबतच निरनिराळय़ा स्वादांची आइसक्रीम्स हल्ली दिसतात. कुरकुरीत चायनीज ‘दरसान’ आइसक्रीमबरोबर खाण्यासाठी असतं. शिवाय कुल्फी फालुदा, सीताफळ-अंगुर बासुंदी अशी फ्युजन्सही दिसून येतात. जेवण झाल्यावर रंगीबेरंगी मुखवासासोबत विडेही ठेवलेले असतात. तृप्ती देणाऱया या जेवणात एक प्रकारचा मिलाफ दिसून येतो. अळू-वडी, अळूची भाजी, कोथिंबीर-वडी,मोदक, पुरण-पोळी हा मराठी स्वाद असला तरी इतरही अनेक स्वाद तितक्मयाच ठळकपणे जाणवत असतात. त्यात अवधी, पंजाबी, गुजराती, राजस्थानी, काश्मिरी, बंगाली, दाक्षिणात्य पदार्थ जसे असतात तसेच चायनीज, मेक्सकिन, थाई हेही असतात. त्यातही पाणीपुरी, डोसा, पास्ता, नूडल्स हमखास असतातच.
इतके सगळे पदार्थ आताच्या महागाईच्या दिवसांत खर्चीक तर नक्कीच असतात. मेन्यूप्रमाणे प्रत्येक ताटामागे सहाशे ते बाराशे रुपये इतका खर्च आजकाल येतो. काउंटरचा खर्च हा जास्तीचा असतो. तरीही असे काउंटर फायद्याचे ठरत असावेत. आवड आणि आर्थिक या दोन्ही दृष्टीनं! ‘लाइव्ह काउंटर’ म्हणजे काय? आपल्यासमोर आपल्या आवडत्या चवीचा पदार्थ गरमागरम करून मिळतो. ‘तवा भाजी’साठी मोठय़ा तव्यावर आधीच तेलावर परतून घेतलेल्या भाज्या – बटाटा, वांगी, भेंडी, सिमला मिरची, कारली, फ्लॉवर, मशरूम, तोंडली – कडेनं गोलाकार रचलेल्या असतात. आपल्याला हवी ती भाजी सांगायची, की लगेच तव्यावरच्या उरलेल्या जागेत त्या भाज्या मिक्स करून त्यावर तिखट, मीठ, मसाला घालून, परतून तुमच्या डिशमध्ये ती अवतरते. ‘लाइव्ह काउंटर’ प्रमाणेच ‘सरसों दा साग’, ‘अमृतसरी छोले’, ‘उंधियू’, ‘गट्टे की सब्जी’, ‘दम आलू’ असे इतर प्रांतीय पारंपरिक पदार्थही असतात. इतकं सगळं एकाच वेळी, एकाच ठिकाणी आपल्या नातेवाईक, मित्रमंडळींसोबत खाण्याची मजा काही औरच! हल्लीचा बदललेला मेन्यू जणू एक ‘पारंपरिक खाद्यमहोत्सव’च असतो. थोडक्मयात, वाढायची पद्धत बदललीय, मेन्यूही बदललाय; पण बदलली नाहीय ती आपली आतिथ्यशील संस्कृती!