प्रतिनिधी/ सातारा
नेले (ता. सातारा) येथील गट नं. 611 या मिळकतीच्या 32 ग विक्री प्रमाणपत्राचा दस्त करतेवेळी बोगस व्यक्ती उभ्या करुन बनावट दस्त तयार सदरचा दस्त व व्यक्ती खऱया असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी चंद्रकांत सदाशिव धोत्रे, महादेव गुलाब जाधव, जगन्नाथ गणपती जाधव तिघे (रा. नेले) व एक अनोळखी व्यक्ती अशा चौघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग 2 विजय शहाजी जगताप (वय 52, रा. नितीराज निवास, अहिरे कॉलनी, देगावरोड एमआयडीसी सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नेले, ता. सातारा येथील रामदास गुलाबराव जाधव यांनी दुय्यम निबंधक कार्यालयास 2019 मध्ये बोगस दस्त झाल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार दुय्यम निबंधक कार्यालयाने तपासणी व चौकशी केली असता 7 जून 2010 रोजी सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात गट नं. 611 मिळकतीच्या 7/12 उताऱयावरील सह हिस्सेदार मधुकर यदू पवार, मारुती यदू पवार, व छबुबाई दशरथ निकम होते.
मात्र, 32 ग विक्री प्रमाणपत्र नोंदणीकामी सहाय्यक दुय्यम निबंधक वर्ग-2 सातारा क्र. 1 यांच्यासमोर मारुती यदु पवार यांच्या ऐवजी अनोळखी बोगस इसम व मधुकर यदु पवार ऐवजी नेले गावातील जगन्नाथ गणपती जाधव यांना उभे करुन जबाब दिले गेले. या बोगस व्यक्तींना दस्त नोंदणी करताना संगणकावर फोटो घेवून ओळख पटवून देणारे व साक्षीदार म्हणून चंद्रकांत सदाशिव धोत्रे व महादेव गुलाब जाधव दोघे (रा. नेले ता. सातारा) हे होते. तसेच दस्त नोंदणी वेळी मारुती व मधुकर यदू पवार यांची बहिण या सहहिस्सेदार उपस्थित असताना त्यांनी देखील जाणीवपूर्वक फसवणुकीत साथ दिली आहे.
चंद्रकांत सदाशिव धोत्रे, महादेव गुलाब जाधव, जगन्नाथ गणपती जाधव व अनोळखी इसम व छबुबाई दशरथ निकम या सर्वांनी संगनमताने बनावट दस्ताची नोंदणी केली आहे. सदर दस्तातील लिहून घेणार मधुकर यदु पवार यांच्या ऐवजी जगन्नाथ गणपती जाधव यांना बोगस व्यक्ती म्हणून उभा करुन बनावट दस्त नोंदणी केल्याचे सुनावणी दरम्यान कार्यालयाचे चौकशीमध्ये प्रथम दर्शनी निष्पन्न झाले आहे. मात्र, यातील छबूताई निकम या मृत आहेत.
या व्यतीरिक्त तक्रारदार यांच्या अर्जानुसार मारुती यदु पवार यांचे ऐवजी उभा केलेला बोगस अनोळखी इसमाचे दस्तावर घेतलेले फोटो तक्रारादार रामदास गुलाबराव जाधव यांनी पुराव्या दाखल दिलेल्या खरेदीपत्रावरील मारुती यदू पवार हे स्पष्टपणे भिन्न असून ते सुद्धा बोगस असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे पुढील तपास करत आहेत.