30 वर्षांमध्ये 3 लाखांहून अधिक रोपांची लागवड
‘जगात जे तुम्ही पाहू इच्छिता, ते आधी स्वतःमध्ये अंगिकारा’ असे बोलले जाते. तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये राहणारे मारीमुत्थू योगनाथन यांची कथा तुम्हाला हेच समजावते. योगनाथ हे पेशाने बसवाहक (कंडक्टर) आहेत. पण मागील 30 वर्षांमध्ये 3 लाखांहून अधिक रोपांची लागवड करून ते ‘ग्रीन योद्धा’ या नावाने लोकप्रिय झाले आहेत. समाजमाध्यमांवर या खऱयाखुऱया ‘पर्यावरणवाद्या’ची गोष्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

योगनाथन यांनी मागील 30 वर्षांमध्ये 3 लाखांहून अधिक रोपांची लागवड केली असून ती देखील स्वतःच्या खर्चाने. 52 वर्षीय योगनाथन यांच्यावरील धडा सीबीएसईच्या 5 वी वर्गातील सामान्य ज्ञानाच्या पुस्तकात ‘ग्रीन योद्धा’ या नावाने सामील करण्यात आला आहे. मारीमत्थू योगनाथन हे 12 वीपर्यंत शिकलेले असून मागील अनेक वर्षांपासून तामिळनाडू राज्य रस्ते परिवहन महामंडळासाठी (टीएनएसटीसी) काम करत आहेत. रोपांची लागवड करण्याचे काम ते मागील 30 वर्षांपासून अव्याहतपणे करत आहेत.
त्यांनी लावलेले रोप आता बहारदार वृक्ष झाले असून त्यातून पर्यावरणाचे जतन होण्यासह वाटसरूंना सावली, पक्ष्यांना त्यांचा आसरा तसेच गोड फळे मिळाली आहेत. त्यांच्या या कार्याचे सामाजिक संघटना, प्रसारमाध्यमे तसेच लोकांकडून कौतुक केले जात आहे. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडून त्यांच्या कार्याचा गौरवही झाला आहे.