
कोलकत्ता : पादत्राणांच्या विश्वात नाव कमावलेली कंपनी बाटा इंडिया आपल्या व्यवसायाचा विस्तार आगामी काळात छोटय़ा शहरांमध्ये करणार आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये कंपनी 100 स्टोअर्स उपनगरी आणि ग्रामीण भागांमध्ये सुरू करणार असल्याचे सांगण्यात येते. नवी स्टोअर्स ही प्रँचाइजी स्वरूपात सुरू केली जाणार असल्याचे कंपनीने सांगत देशभरात सध्याला कंपनीची 1500 स्टोअर्स असल्याचे सांगितले. कंपनी स्टोअर्सची संख्या 2023 पर्यंत 2 हजार इतकी करण्याचा विचार करते आहे. यावषी कंपनी 100 स्टोअर्स सुरू करणार असून ही सर्व स्टोअर्स टायर टू-टायर थ्री शहरांमध्ये सुरू केली जाणार आहेत. येणाऱया काळात शहरापेक्षा ग्रामीण भागामध्ये व्यवसाय विस्तार करण्यावर जोर दिला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेकांना बाहेर पडण्याबाबत मर्यादा आल्या आहेत. म्हणूनच त्यांना त्यांची आवडती पादत्राणे घेता यावीत यासाठी दुकानांची संख्या वाढवली जाणार असल्याचे बाटा इंडियाचे सीईओ संदीप कटारिया यांनी सांगितले.
होंडाची नवी झॅज बाजारात

मुंबई : उत्सवी काळाच्या हंगामात होंडा कार्स इंडियाने आपली नवी झॅज ही कार बुधवारी भारतीय बाजारात मोठय़ा दिमाखात उतरवली आहे. बीएस-6 शेणीवर आधारित या कारची किंमत (एक्सशोरूम, दिल्ली) 7.49 लाख रुपये इतकी असणार आहे. 1.2 लिटर आय-व्हीटेक पेट्रोल इंजिन या गाडीला असणार असून मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही प्रकारात गाडी उपलब्ध असणार आहे. होंडा कार्स इंडियाचे सीईओ आणि अध्यक्ष गाकू नकानिशी यांनी सांगितले की, कंपनीला आपली नवी झॅज कार ग्राहकांना देताना अत्यानंद होत आहे. गेल्या 2 महिन्याच्या कालावधीत कंपनीने आपली चौथी कार भारतीय बाजारात दाखल केली आहे. ही नवी गाडी ग्राहकांचे समाधान नक्कीच करेल असा विश्वास आपल्याला आहे. अनलॉकनंतर कारखान्यातील उत्पादनाने वेग घेतला असून येणाऱया काळात ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपनी प्रयत्न करणार असल्याचे नकानिशी यांनी सांगितले.
गॅलेक्सी टॅब एस-7 भारतात दाखल

दिल्ली : सॅमसंगने आपला नवा गॅलेक्सी टॅब एस-7 भारतीय बाजारात लाँच केला आहे. वाय-फाय आणि एलटीई या दोन प्रकारात टॅब उपलब्ध आहे. दोन्ही टॅब मिस्टिक ब्राँझ, मिस्टिक ब्लॅक आणि मिस्टिक सिल्वर अशा रंगांमध्ये येणार आहेत. या टॅबसाठी ग्राहकांना आगाऊ बुकिंग करावे लागणार आहे. सॅमसंग शॉप, ऍमेझॉन आणि फ्लीपकार्ट यासारख्या रिटेल आउटलेट स्टोअरवर ग्राहकांना टॅब बुक करता येणार आहे. वायफाययुक्त गॅलेक्सी टॅब एस-7 ची किंमत 55 हजार 999 रुपये इतकी असणार आहे. यातील एलटीई प्रकारातील टॅबची किंमत 63 हजार 999 ते 79 हजार 999 रुपये असणार आहे. बुकिंग करणाऱयांना सवलतीचा लाभ आहे घेता येणार आहे. एचडीएफसी कार्डधारकांना 5000 पर्यंत रोख सवलत मिळणार आहे.