देशात 24 तासात कोरोनाचे 45,209 रुग्ण, 501 रुग्णांचा मृत्यू
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशात कोरोना संक्रमितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. कोरोनाने सर्वात जास्त दिल्ली प्रभावित झाल्याचे दिसत आहे. देशात आता कोरोना रुग्णांची संख्या 91 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. मागील 24 तासात देशात कोरोनाचे 45,209 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 501 लोकांना जीव गमवावा लागला. दिवसभरात दिल्लीत सर्वाधिक 5,879 नवीन रुग्ण सापडल्याने संसर्ग पसरण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडय़ानुसार, देशात 45 हजारहून अधिक नवी प्रकरणे समोर आल्यानंतर कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 90 लाख 95 हजार 806 झाली आहे. देशात आतापर्यंत 85 लाख 21 हजार 617 लोक रिकव्हर झाले आहेत. कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 93.69 टक्के झाले आहे. तर देशात अजूनही 4 लाख 40 हजार 962 सक्रिय रुग्ण आहेत. मागील 24 तासात झालेल्या मृत्यूंनंतर देशात मृतांची संख्या वाढून आता 1 लाख 33 हजार 227 झाली आहे. आयसीएमआरनुसार, देशात मागील 24 तासात 10 लाख 75 हजार 326 कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत.
दिल्लीत दिवसभरात सर्वाधिक नवे रुग्ण
कोरोनाने सध्या सर्वात प्रभावित दिल्ली दिसत आहे. दिल्लीत शनिवारी कोरोना विषाणूची 5,879 नवी प्रकरणे समोर आली आणि संसर्ग दर 12.90 टक्के राहिला. दिल्लीत मागील 24 तासात आणखी 111 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर एकूण मृतांची संख्या 8,270 झाली आहे. दिल्लीच्या आरोग्य विभागानुसार नवीन प्रकरणे शुक्रवारी करण्यात आलेल्या 45,562 तपासण्यांमधून समोर आली. दिल्लीत आता एकूण रुग्णांची संख्या वाढून 5 लाख 23 हजार 117 झाली आहे.
दिल्लीखालोखाल महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाचे 5 हजार 760 नवीन रुग्ण सापडले आहेत. मात्र एकंदर संक्रमितांचा आकडा 17 लाख 74 हजार 455 वर पोहोचला आहे.
गुजरातमध्येही रुग्णसंख्या वाढत असून शनिवारी कोरोना विषाणूची एका दिवसात सर्वात जास्त 1,515 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर एकूण प्रकरणांची संख्या वाढून 1 लाख 95 हजार 917 झाली आहे. यापूर्वी राज्यात 25 सप्टेंबरला एका दिवसात सर्वाधिक 1,442 प्रकरणे समोर आली होती.