टेस्टींगचे प्रमाण वाढवा : मंत्री शंभूराज देसाई,सोमवारी 1,667 जणांचा अहवाल बाधित
प्रतिनिधी / सातारा
पुन्हा नव्याने सुरु करण्यात आलेल्या कडक लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी बाधित वाढीने दोन हजार रुग्ण वाढीचा रतीब बंद झाला. सोमवारी अहवालात 1,667 जणांचा अहवाल बाधित आला तर मृत्यूची संख्याही 21 एवढी खाली आल्याने मोठा नसला तरी अल्प दिलासा जिल्हावासियांना लाभला आहे. तर सायंकाळी 1,775 जणांनी कोरोनावर मात करत या लढाईला बळ दिले आहे.
टेस्टींगचे प्रमाण वाढवा : मंत्री शंभूराज देसाई
जिह्यात कडक निर्बंध असल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रेट काही प्रमाणात कमी झाला असून पॉझिटिव्ह रेट आणखीन कमी करण्यासाठी विविध उपाय योजना करुन कोरोना टेस्टींगचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या. लसीकरण केंद्रावर नागरिकांना टोकन दिल्या नंतर त्या नागरिकांना सकाळी 9 ते 11 या वेळेतच लसीकरण करावे तसेच जो नागरिक कोरोना बाधित झाला आहे त्याच्या संपर्कात जे-जे आले आहेत त्या सर्वांचा शोध घ्यावा. तिसऱया लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टीने आत्तापासूनच तयारी करावी.
लोकांचा कडक लॉकडाऊनला विरोध
जिल्हय़ात कोरोना संसर्गाचे आकडे कमी होत नसल्याने पुन्हा आठ दिवसाचा कडक लॉकडाऊन करण्यात आला. मात्र, लॉकडाऊनमध्ये कोरोनाचे आकडे वाढतच होते. मृत्यूदरही वाढत असल्याने जिल्हा पुन्हा पॅनिक झाला आहे. त्यातच आता पुन्हा मे महिन्यात देखील आठ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आल्याने त्याला नागरिकांचा विरोध होत आहे. निदान किराणा दुकाने, भाजीपाला विक्री तरी सुरु ठेवावी, अशी मागणी होत आहे.
वेग मंदावू लागल्याचा अल्प दिलासा
गेल्या महिनाभर दररोज दोन हजाराच्या संख्येने बाधितांची आकडेवारी समोर येत होते. गेले दोन, तीन दिवस हा रतीब बंद झाला आहे. ही आकडेवारी दोन हजारांच्या आत आली असून सोमवारी रात्रीच्या अहवालात 1,667 जणांचा अहवाल बाधित आला आहे. यामध्ये सात तालुक्यात अद्यापही तीन अंकी संख्येने वाढ आहे तर चार तालुक्यांमध्ये दोन अंकी संख्येने वाढ समोर आलीय. यामध्ये ती थोडी कमी आल्याचा अल्प दिलासा तरी लाभलाय.
1,667 जणांचा अहवाल बाधित
तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. फलटण 339 (26,360), सातारा 345 (35,466), कराड 206 (22,399), खटाव 189 (15,977), जावली 109 (7,632), कोरेगाव 114 (14,338), पाटण 106 (6,981), खंडाळा 79 (10,443), माण 92 (11511), वाई 67 (11,593), महाबळेश्वर 14 (4030) व इतर 7 (1062) असे आज अखेर एकूण 1,67,792 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.
जिल्हय़ात 21 बाधितांचा मृत्यू
तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. सातारा 11 (1,044), कराड 4 (647), कोरेगांव 2 (317), फलटण 2 (253), खटाव 1 (414), माण 1 (214), खंडाळा 0 (135), महाबळेश्वर 0 (44), जावली 0 (168), पाटण 0 (157), वाई 0 (305) असे आज अखेर जिह्यामध्ये एकूण 3,698 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हय़ात 2,014 बेड रिक्त आजमितीस जिल्हय़ात कोव्हिड हॉस्पिटलमध्ये 6 हजार 809 बेड उपलब्ध असून त्यापैकी कोव्हिड हॉस्पिटल्समध्ये 4,813 तर कोरोना केअर सेंटर 1,996 असे मिळून ही संख्या आहे. यामध्ये प्रत्यक्ष हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2,299 एवढी आहे. यामध्ये आयसीयू व्हेंटीलेटरसह 39 बेड, आयसीयू व्हेंटिलेटरविना 168, ऑक्सिजनसह 1,279 बेड आणि ऑक्सिजनविना 528 असे 2,014 बेड रिक्त आहेत.