पूजेच्या साहित्यांचे स्टॉल सजले, विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनासारख्या राक्षसाला तोंड देत ‘देवाक् काळजी’ या विश्वासाने बेळगावनगरीला बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. विघ्नहर्ता बाप्पाने या महामारीचा नायनाट करावा अशी प्रार्थना करत हळूहळू का होईना मात्र बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. अर्थात कोरोनाचे गडद सावट आणि पावसाची संततधार यामुळे बाजारपेठेला उठाव नाही. मात्र त्यातूनही परंपरेनुसार गणेशपूजनासाठी लागणाऱया गणेशमूर्ती, आरास-सजावटीचे साहित्य, मखर-मंदिरे, हा र तुरे, पूजेच्या साहित्यांचे स्टॉल सजले आहेत. यामुळे जणू बाप्पाच्या स्वागतासाठी बेळगावनगरी सज्ज होऊ लागली आहे.
यंदाचा गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. यामुळे खरेदीसाठी नागरिकांची पावले बाजारपेठांकडे वळू लागली आहेत. दरवर्षी महिनाभर आधीपासूनच गणेशोत्सवाच्या तयारीला वेग येतो. मात्र गतवर्षी पूरस्थिती आणि यंदा कोरोना यामुळे बेळगाव नगरी सावधपणे तयारीला लागले. बेळगावचा गणेशोत्सव हा प्रामुख्याने मोठय़ा उत्साहात साजरा केला जातो. यामुळे यंदा मात्र गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला जाईल याबाबत शंका नसल्याचे दिसून येत आहे. घरगुती गणेशोत्सवाच्या स्वागतासाठी घरोघरी तयारीला सुरुवात झाली आहे.
बाजारपेठा सज्ज
गणरायाच्या आगमनाची चाहूल प्रामुख्याने बाजारपेठेत भरलेल्या साहित्यांच्या प्रदर्शनानेच लागते. यंदा देखील बाजारपेठा सज्ज झाल्या असून व्यापारी वर्गाकडून गणरायाच्या स्वागतासाठी नानाविध प्रकारचे साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मात्र कोरोनाची भीती, पैशांची चणचण शिवाय पावसाची संततधार, परराज्यांतून येणाऱयांना बंदी, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अपुऱया सुविधा अशा समस्यांमुळे बाजारपेठेत खरेदी होत नसल्याचे मत व्यक्त होत आहे. शनिवार, रविवारी खरेदीचा दिवस होता. मात्र पावसाची संततधार यामुळे दरवर्षी आठवडाभर आधी 70 ते 80 टक्के होणारी खरेदी यंदा केवळ 30 ते 40 टक्क्यांवर आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत साहित्यांचे दर स्थिर आहेत. 10 ते 15 टक्के इतकाच फरक आहे. शिवाय मुंबई, अहमदाबाद या भागातून नाविन्यपूर्ण साहित्य दाखल झाले आहे. मात्र महामारीच्या संकटात ग्राहकांचा प्रतिसाद म्हणावा तितका नसल्याचे मत व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे.
विविध साहित्यांचे स्टॉल सजले.
मखरपासून बाप्पांच्या आभूषणापर्यंतचे साहित्य बाजारात आले आहे. थर्माकॉलचे मखर, कापडी मंडप, हॅण्डमेड मंदिरे, फेटे, छत्री, फुलांच्या माळा, झिरमिळय़ा, कागदी माळा, प्लास्टिक पानाफुलाच्या माळा, तोरण, लाईटच्या माळा, किरीट, बाप्पाचे अलंकार, शेला, शिवाय रॉ मटेरियला पासून वैविध्यपूर्ण सजावट करण्यासाठी रॉ मटेरियल, पताक्यांचे कागद, चकमकी पेपर, वेलवेट पेपर, रंगीबेरंगी पेपर असे साहित्य उपलब्ध आहे. मारुती गल्ली, पांगुळ गल्ली, गणपत गल्ली शिवाय खडेबाजार, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, बुरुड गल्ली, कडोलकर गल्ली शिवाय शहापूर बाजारात साहित्यांची दुकाने सजली आहेत.
व्यापाऱयांच्या प्रतिक्रिया
बाजारपेठेत येण्याची मुभा नसल्याने व्यापार थंडच : विकी मेहता
कोरोनाचा वाढत्या संसर्गात नागरिकांमध्ये भीती आहे. शिवाय नेमके काय करायचे आणि काय नाही करायचे याचे चित्रच स्पष्ट नसल्याने बाजारपेठेकडे येणे टाळले जात आहे. प्रामुख्याने बेळगाव बाजारपेठेला सिंधुदुर्ग, गोवा याभागातून उठाव असतो. बाजारपेठेत येण्याची मुभा नसल्याने व्यापार थंडच आहे. गणेशोत्सवाचा दरवर्षीचा उत्साह पाहून सर्व साहित्य आयात केले आहे. मात्र प्रशासनाकडून चित्र स्पष्ट होण्यास झालेला विलंब व्यवसायावर परिणाम करणारा ठरत आहे. यामुळे व्यापाऱयांचा, व्यावसायिकांचा विचार व्हावा असे मत विकी मेहता यांनी व्यक्त केले.
बाजारपेठ अजूनही संथच : मिलन राजपुरोहित
सण अवघ्या चार दिवसावर आला आहे मात्र आतापर्यंत केवळ 20 ते 30 टक्के खरेदी झाली आहे. कोरोनाच्या भितीत सामाजिक अंतर राखण्याबरोबरच मार्गसूची जाहीर करण्यात आली आहे. यामुळे काहीसा उत्साह कमी झाला आहे. घराघरात सार्वजनिक गणेशोत्सवात करण्यात येणाऱया डेकोरेशनला ब्रेक लागल्याने बाजारपेठ अजूनही संथच आहे.
गणेशोत्सवावर देखील कोरोनाची गडद छाया : परशराम कावळे
गणेशोत्सवावर देखील कोरोनाची गडद छाया आहे. भीती, मर्यादा यामुळे मागणीचा ओढा कमी आहे. दरवर्षी गोवा, सावंतवाडी येथील हौशी गणेशभक्तांकडून उत्सवासाठी मोठय़ा प्रमाणात खरेदी हेते. शनिवार, रविवार पावसाच्या संततधारेमुळे खरेदीचा मुहूर्त हुकला. मात्र विघ्नहर्ता बाप्पाच्या आशीर्वादाने चार-पाच दिवसांत खरेदी होईल, अशी आशा असल्याचे मत परशराम कावळे यांनी व्यक्त केले.