प्रतिनिधी/ रत्नागिरी
‘गणपती बाप्पा मोरया..मंगलमूर्ती मोरया’..च्या जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. संपूर्ण कोकणासह मंगळवारी रत्नागिरी जिल्हाभरात आपला लाडका बाप्पा घरी आणण्यासाठी भक्तगण दंग झाले आहेत. मंगळवारपासूनच घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींच्या आगमनाला प्रारंभ झाला.
आज 31 ऑगस्ट रोजी गणेशचतुर्थीच्या दिवशी जिल्ह्य़ात 114 सार्वजनिक तर 1 लाख 66 हजार 140 खासगी गणपतींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. संपूर्ण कोकणातही गणेशोत्सवात वातावरणात नवचैतन्य पसरते. अस्सल पारंपरिक आणि घरगुती गणेशोत्सवाचे विशेष महत्त्व असणाऱया रत्नागिरी जिल्हय़ासह शहरातील गणेश आगमनाचा डामडौल मिरवणुकांचा असतो. पण ग्रामीण भागातील आगमनाचा उत्साह हा निराळाच पहावयास मिळतो. मिरवणुकांबरोबरच गणेशभक्त बहरलेल्या शेता-भाताच्या पायवाटेने डोक्यावरून आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन येत असतात. ठिकठिकाणच्या गणेशमूर्ती शाळांमध्ये गणेशमूर्ती नेण्याची गजबज झाली आहे.

मंगळवार 30 ऑगस्टच्या सकाळपासूनच ठिकठिकाणच्या गणेशमूर्ती शाळांमधून गणेशभक्त आपल्या गणरायाला प्रतिष्ठापना करण्यासाठी मिरवत निघाल्याचे दिसत होते. पावसाचे सावट असले तरी गणेश आगमनाला पावसाने उसंत घेतल्याने गणेशभक्तांना चांगलीच मोकळीक मिळाली होती. प्रथेप्रमाणे गणरायाची दृष्ट काढून त्याला स्थानापन्न करण्यात येणार आहे. दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर या वेळेस गणेशोत्सवाचा डामडौल मोठा आहे. भक्तगणांमध्येही नवचैतन्याचे वातावरण पसरले आहे. महागाईची झळ बसत असली तरीही या उत्सवाच्या आनंदाला तोटा नसल्याचे चित्र आहे. कोकणात लाखोंच्या संख्येने चाकरमानी दाखल झालेत. आजपासून गणपती आगमनाबरोबरच पुढे गणपती-गौरी विसर्जन, दिड दिवसांचे गणपती विसर्जन, वामनद्वादशी विसर्जन, अनंत चतुर्दशीपर्यंत भजनं आणि लोककलांनी कोकणातला हा गणेशोत्सव बहरून जाणार आहे.
साहित्य खरेदीसाठी बाजारात झुंबड
गणेशमूर्तींसोबतच बाप्पाच्या पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गणपती बाप्पाचे आवडते खास मोदक घेण्यासाठी मिठाईच्या दुकानात भक्तांची गर्दी झालेली दिसून येत आहे.