विंडीजविरुद्ध दुसरी कसोटी ः पहिल्या दिवसअखेर पाकिस्तान 4 बाद 212
वृत्तसंस्था/ किंग्जस्टन
कर्णधार बाबर आझम आणि फवाद आलम यांच्या अर्धशतकांच्या जोरावर येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या विंडीज विरूद्धच्या दुसऱया कसोटीत खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर पाकने पहिल्या डावात 4 बाद 212 धावा जमविल्या. कर्णधार बाबर आझमने 75 धावा जमविल्या तर फवाद आलमला 76 धावांवर दुखापतीमुळे निवृत्त व्हावे लागले.
या दुसऱया कसोटीत विंडीजने नाणेफेक जिंकून पाकला प्रथम फलंदाजी दिली पण विंडीजच्या अचूक गोलंदाजीसमोर पाकच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. त्यांचे पहिले तीन फलंदाज केवळ दोन धावांमध्ये तंबूत परतले. रॉचच्या पहिल्याच षटकातील तिसऱया चेंडूवर पाकचा सलामीचा फलंदाज अबीद अली ब्लॅकवूडद्वारे झेलबाद झाला. त्याने केवळ एक धाव जमविली. डावातील तिसऱया षटकांत रॉचने पाकला आणखी एक धक्का देताना अझहर अलीला खाते उघडण्यापूर्वै डिसिल्वाकडे झेल देण्यास भाग पाडले. दरम्यान चौथ्या षटकांतील पाचव्या चेंडूवर सिलेसने इम्रान बट्टला झेलबाद केले. त्याने केवळ 1 धावा जमविली.
कर्णधार बाबर आझम आणि फवाद आलम यांनी पाकचा डाव सावरताना तिसऱया गडय़ासाठी 158 धावांची भागिदारी केली,. संघाच्या धावसंख्या 160 असताना चहापानानंतरच्या कालावधीत फवाद आलमच्या पायामध्ये जबरदस्त पेटके आल्याने त्याला मैदान सोडावे लागले. या कसोटीवेळी तापमान अधिक असल्याने विंडीजचा यष्टीरक्षक डिसिल्वा याची तब्बेत बिघडल्याने त्याला तंबूत परतावे लागले आणि हॅमिल्टनने दिवसभराच्या उर्वरित कालावधीत यष्टीरक्षण केले. केमर रॉचने आपल्या दुसऱया हप्त्यातील गोलंदाजीत कर्णधार बाबर आझमला होल्डरकरवी झेलबाद केले. जवळपास पाचतास खेळपट्टीवर राहून बाबर आझमने 174 चेंडूत 75 धावा जमविल्या.
मोहम्मद रिझवान आणि फईम आश्रफ यांनी पाचव्या गडय़ासाठी अभेद्य 44 धावांची भागिदारी केली आहे. रिझवान 22 तर आश्रफ 23 धावांवर खेळत आहे. 74 षटकांत पाकने पहिल्या डावात 4 बाद 212 धावा जमविल्या. अंधूक प्रकाशामुळे पंचांनी खेळ लवकर थांबविला. विंडीजतर्फे रॉचने 49 धावांत 3 तर सिलेसने 25 धावांत 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
पाक प. डाव 74 षटकांत 4 बाद 212 (अबीद अली 1, इम्रान बट्ट 1, अझहर अली 0, बाबर आझम 75, फवाद आलम दुखापतीने निवृत्त 76, रिझवान खेळत आहे 22, अश्रफ खेळत आहे 23, अवांतर 14, रॉच 3-49, सिलेस 1-25).