वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाला अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचा अध्यक्ष बनण्याची इच्छा असून भविष्यात या पदासाठी निवडणूक लढविण्याचा मी निश्चितच विचार करेन, असे त्याने म्हटले आहे.
10 वर्षांच्या कालावधीत भुतियाने भारतीय फुटबॉल क्षेत्रामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. 2011 साली तो फुटबॉल क्षेत्रातून निवृत्त झाला. भारतीय फुटबॉलचा दर्जा सुधारण्यासाठी त्याने विविध योजना राबविल्या आहेत. सिक्कीममध्ये लवकरच बायचुंग भुतिया फुटबॉल स्कूल आणि युनायटेड सिक्कीम क्लब यांची स्थापना केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 100 आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळणारा 43 वर्षीय भुतिया हा भारताचा पहिला फुटबॉलपटू आहे. अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे तत्कालीन अध्यक्ष प्रियरंजन दास मुन्शी यांची प्रकृती नादुरूस्त झाल्याने त्यांनी स्वत:ला फेडरेशनपासून अलिप्त ठेवले. त्यानंतर म्हणजे 2008 पासून प्रफुल पटेल एआयएफएफचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. पण नव्या क्रीडा धोरणामुळे त्यांना या पदासाठी पुढील निवडणूक लढविता येणार नाही.
भारतीय संघाचा व एफसी गोवा संघाचा ब्रँडन फर्नांडिस हा भारताचा सध्याचा सर्वोत्तम मिडफिल्डर आहे तर सुनील छेत्री हा दैवी देणगी लाभलेला स्ट्रायकर असून सध्या त्याला पर्यायच नाही. त्याची गोल नोंदवण्याची विक्रमी कामगिरीच त्याची योग्यता सिद्ध करून दाखविते, असेही भुतिया म्हणाला.