अक्कलकोट प्रतिनिधी
येथील वागदरी रोडवरील नवीन बायपास पुलाला गळफास घेवुन एक २५ ते ३० वर्षाचा अनोळखी युवक मयत झाला. दहा मार्च रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. याची उत्तर पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाली असुन मयताची ओळख पटली नाही.
याबाबत पोलीस सुत्राकडुन मिळालेली अधिक माहिती अशी की, वागदरी रोडला खबर देणारा १० मार्च रोजी सकाळी ९ वा चे सुमारास शेताला जात असताना वागदरी रोडवरील नवीन बायपासवरील पुलावरील लाईटच्या खांबाला एक युवक केसरी रंगाच्या फेटयाच्या कापडाने गळफास घेतलेला दिसला. मयत अज्ञात इसम हा अंदाजे २५ ते ३० वर्षाचा असुन त्याचे अंगावर शर्ट नसुन करड्या रंगाची पॅन्ट होती. त्याचे छातीवर उजव्या बाजुस ओम व त्रिशुल गोंदलेले दिसत आहे व डाव्या बाजुस छातीवर तीळ दिसत आहे. तसेच त्याचे पॅन्ट तपासुन पाहता काहीही सापडले नाही.
किशोर केरबा सिध्दे, अक्कलकोट यांनी खबर दिली.अधिक तपास पोलीस करत आहेत.मयताबाबत काही माहिती असल्यास ०२१८१-२२०२४५ या क्रमांकावर संपर्क करावे असे आवाहन पोलीसांनी केले.